काही माणसांशी आपली मैत्री का होते, कशी होते आणि अचानक ती का तुटते, याचं उत्तर ' योगायोग ' याशिवाय वेगळं काही मिळणं कठीण असतं. मुळात ती मैत्री होणंच एक मोठं आश्चर्य असू शकतं. कोणाशीही चटकन संवाद साधू शकणाऱ्या आणि चित्रविचित्र माणसांची सोबत आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर मुद्दाम एखाद्या व्यक्तीपासून लांब राहायचा प्रयत्न करायची वेळ तशी अभावानेच आलेली आहे. तनजीब हुसेन नावाच्या नावाचा बांगलादेशी महाभाग माझ्या आयुष्यात असाच अपघाताने आला आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात अपघातांची मालिका सुरु होईल की काय, अशी भीती वाटून कधी नव्हे तो मी त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाचा चांगलाच आटापिटा करून घेतला. सुरुवातीच्या काळात दुबईला एका खोलीत दोन ते तीन डोकी अशा पद्धतीचं राहणं नशिबात आलेलं होतं. अशा प्रकारे राहताना बरोबरीची व्यक्ती कोणत्या गावची , पार्श्वभूमीची आणि संस्कृतीची आहे, हे काही दिवसात हळू हळू उलगडत जाणाऱ्या ओळखीतून समजत जाई. आपल्याकडच्या चाळीत भाडेकरू मालकावर डाफरू शकतो, पण दुबईला मात्र स्वच्छता आणि वेळेवर भाडं या दोन गोष्टी सोडल्या तर इतर कोणत्याही गोष्टींवरच्या तक्रारील...