Skip to main content

शापित यक्ष

चित्रपटात, नाटक आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं आवडत नसलेला मनुष्यप्राणी सापडणं आजच्या जगात मिळणं जवळ जवळ अशक्यप्राय आहे. मागच्या चाळीस-पन्नास वर्षात या क्षेत्रात झालेल्या जबरदस्त प्रगतीमुळे आज लहान मुळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण या दृक्श्राव्य माध्यमाशी जवळ जवळ व्यसनाधीन झाल्यासारखा जोडला गेलेला आहे. आजच्या 'डिजिटल' युगात आंतरजालाच्या पायावर उभी राहिलेली OTT platforms या सगळ्यात अजून भर घालत आहेत. या माध्यमाशी व्यवसायानिमित्त थेट जोडला गेलेला आणि अल्पावधीत काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायच्या धाडसामुळे आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेला फराझ माझ्या आयुष्यात काही क्षणच आला, पण त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांनी मला जे जे काही दिलं, त्याबद्दल आजन्म मी त्याच्या ऋणात बांधला गेलो. 

फराझ हा मनुष्य काश्मिरी. भारत आणि पाकिस्तान ( आणि या दोन्ही देशांच्या कर्मकरंटेपणामुळे हळूच आत शिरून नंतर ऐसपैस पाय पसरलेला महाधूर्त चीन ) यांच्यात वर्षानुवर्ष सुरु असलेला जीवघेणा संघर्ष ज्या नंदांवनाचं महाभारतानंतरच्या भयाण कुरुक्षेत्रात रूपांतर करून गेला, त्या भूमीतल्या एका मूळच्या सुखवस्तू काश्मिरी मुस्लिम घरात फराझ जन्माला आला. त्याच्या आजोबांना उर्दू शायरीचा आणि साहित्याचा इतका नाद होता, की त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीची नावं आपल्या आवडीला अनुसरून ठेवली होती. आपल्या नातवाचं नामकरण त्यांनी   विख्यात शायर 'अहमद फराझ' च्या नावावरून योजलेलं होतं आणि स्वतः हयात असेपर्यंत त्यांनी त्याला अतिशय लाडाकोडात वाढवलं. मी पहिल्यांदा फराझला भेटलो, तेव्हा त्याच्या पाणीदार भुऱ्या डोळ्यांनी माझ्यावर गारूड केलं होतं. लांब सोनेरी केस, सहा फुटाची सणसणीत उंची, लालसर गौर वर्ण, काश्मिरी लोक ठेवतात ताशा वळणाची दाढीमिशी आणि शिडशिडीत काटक अंगकाठी अशा थाटाचा हा मनुष्य तिशीच्या दारात असला तरी विशीचा वाटत होता. माझ्या राहत्या घराच्या समोरच्या घरातल्या एका कुटुंबाबरोबर ' पेइंग गेस्ट ' म्हणून आलेला हा तरुण मी संध्याकाळी इमारतीच्या तरण तलावात पोहत असताना माझ्याशी सहज गप्पा मारायला लागला आणि आमची ओळख झाली. काश्मीरच्या बर्फात आयुष्य गेलेला हा प्राणी इतक्या सराईतपणे कसा पोहू शकतो, याचं मला नवल वाटत होतं. शेवटी त्यानेच बोलण्याच्या ओघात खुलासा केला..

" अरे, मी माझ्या शाळेत आणि युनिव्हर्सिटीत खेळाडू म्हणून प्रसिद्ध होतो. व्हॉलीबॉल, क्रिकेट, स्केटिंग, पोहोणे आणि घोडेस्वारी यात मी निपुण आहे. थोडीफार धनुर्विद्या शिकलोय...मॅटवरची कुस्ती खेळलोय...मला खूप आवड आहे खेळाची...त्याच्याच जोरावर तर युनिव्हर्सिटीला खास खेळाडू कोट्यातून पत्रकारितेच्या कोर्सला दाखल मिळवला...जोडीला पोलिटिकल सायन्स करतोय..." 

मला ऐकून धाप लागली. " बाबा रे, दिवसाला २४ तासच असतात..इतकं सगळं करायला तुला वेळ कसा मिळतो?" " मला आवड आहे...एकदा गोडी लागली की आपोआप होतं रे सगळं..." त्याने खांदे उडवत उत्तर दिलं. " तू काश्मीरच्या कोणत्या भागातून आलायस?" मी माझ्या मते साधा प्रश्न केला असला, तरी इतकं वेळ मोकळेपणाने बोलणारा तो माझ्या या प्रश्नावर क्षणभर थबकला. त्याचे डोळे पाणावले, पण " इथे पाण्यात क्लोरीन जास्त असतं काय रे..." सारखी थाप मारून त्याने अश्रू लपवायचा केविलवाणा प्रयत्न केला. मला इतक्या साध्य प्रश्नावर हा इतकं  हळवा कशामुळे झाला हे समजत नव्हतं, पण पुढे त्याने जे काही सांगितलं, ते ऐकून मलाही आतून गलबलून आलं. 

" भारत आणि पाकिस्तानचा नकाशा काढलास ना, तर पाकव्याप्त काश्मीरची नियंत्रणरेषा दिसेल तुला.त्यात कारगिलजवळ मुलबेख म्हणून एक गाव दिसेल. ते माझं मूळ गाव. माझ्या पूर्वजांच्या कितीतरी पिढ्या तिथेच जन्मल्या आणि गेल्या. अचानक १९४८-४९ मध्ये त्या भागच चित्र पालटून गेलं. मग आजोबा आणि वडिलांनी आमच्या राहत्या घरावर पाणी सोडून कोकरनाग गाठलं. तिथेही सुखाने जगणं मुश्किल झालं. मग काही वर्ष बिलौर  गावात राहिलो आणि मी युनिव्हर्सिटीला गेल्यावर आम्ही जम्मूला स्थायिक झालो. दर वेळी नुकसान, नवी सुरुवात आणि स्थिरस्थावर होतोय तोच पुन्हा निघण्याची तयारी..."

" काय शाप आहे काश्मीरसारख्या स्वर्गभूमीला कुणास ठाऊक..." माझ्या तोंडून आपसूक काही शब्द निघून गेले. 

" अरे, आमच्या गावातले आणि कुटुंबातले एकही जण नियंत्रण रेषेच्या त्या बाजूला. त्यांना आजसुद्धा उपरे म्हणून तिथे रोजचे त्रास आणि अवहेलना. इथे आम्ही भारतीय आहोत पण जवळ जवळ भटक्या जमातीतले होऊन राहिलोय...काय करणार? आमच्याकडे आम्ही खाजगीत म्हणतो ना, की जगात इतर ठिकाणी दरवाजा उघडल्यावर प्रकाश आत येतो, पण काश्मीरमध्ये मात्र दरवाजा उघडल्यावर फक्त  मृत्यू आत येतो."

त्या दिवशी पोहोता पोहोता आमच्यात काश्मीर या विषयावर किती वेळ चर्चा रंगली, हे मला आता आठवत नाही, पण दुपारची रात्र होऊन पोटात कालवाकालव झाल्यावर आम्ही नाईलाजाने आवरतं घेतलं. फराझ भरभरून बोलत होता. त्याच्यामुळे मला काश्मीरबद्दल कितीतरी गोष्टी 'समजायला' लागलेल्या होत्या. 

त्या आठवड्याच्या सुटीच्या दिवशी अर्थात फराझला मी सकाळी चहा घेतानाच भटकंतीला घेऊन जायचा बेत ऐकवला. त्याने आनंदाने माझ्या विनंतीला होकार दिला आणि आम्ही घराबाहेर पडलो. आता आमच्या संभाषणात काश्मीर सोडून कोणताही विषय येणं शक्यच नव्हतं. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर या विषयावर अनेक मतप्रवाह आपल्याला छापील आणि दृक्श्राव्य माध्यमांतून समजून घेता येतीलही, पण खुद्द काश्मीरच्या रहिवाशाकडून ऐकलेल्या गोष्टींना थेट ज्ञानेश्वर माऊलीच्या तोंडून पसायदान ऐकण्यासारखं महत्व होतं. 

" एक सांगू? मुळात आमच्याकडे धर्मापेक्षा  'काश्मिरीयत' महत्वाची मानली जायची. रोटीबेटी व्यवहार सुद्धा एका काश्मिरी घराचे दुसऱ्या काश्मिरी घराशी अशाच पद्धतीने व्हायचे. आमचे पूर्वज हिंदू पंडित होते, हे आम्हाला कधीच अमान्य नव्हतं...किती सुंदर, शांत आणि आनंदी होतं सगळं पूर्वीच्या काळी...माझे आजोबा सांगायचे, की काश्मिरी लोक साधे, आदरातिथ्य करणारे आणि सुखाने आयुष्य जगणारे होते...राजकारण मध्ये आलं, भौगोलिक दृष्ट्या मोक्याची जागा म्हणून काश्मीरचं महत्व राजकारण्यांना जाणवलं आणि मग सुरु झाला सगळा खेळ...चार पिढ्या बरबाद केल्या आमच्या..."

" मला माहित आहे रे, काय प्रकार झालाय काश्मीरबरोबर...हजरतबल आणि शंकराचार्य जिथे एकत्र आहेत, सूर्यमंदिर आणि जामिया मशीद जिथे एकत्र आहेत तिथे धर्मावरून दंगे होण्याची खरं तर गरजच नाही...पण...."

" नशीब...प्राक्तन...दुसरं काय..." त्याने सुस्कारा सोडला.

" तू नक्की काय करतोस?" मी कुतूहलाने त्याला विचारलं. 

" मी फिल्ममेकर आहे. नाटक, चित्रपट, माहितीपट आणि लघुपट हे माझं विश्व. मी लिहितो, दिग्दर्शन करतो, थोडीबहुत संकलनाचीही समज आहे आणि वेळ पडलीच तर बऱ्यापैकी कॅमेरासुद्धा हाताळू शकतो. "

" काय सांगतोस काय? हे कुठून शिकलास?"

" पत्रकारितेच्या अभ्यासाच्या वेळी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विद्यार्थी म्हणून गेलो होतो...त्या महोत्सवाचा आढावा घ्यायचं प्रोजेक्ट होतं. ते झालं, पण आयुष्यभरासाठी डोक्यात चित्रपट माध्यमाचा किडा सोडून गेलं. "

" मला वाटलेलं, तुझ्यासारखा माणूस शोधपत्रकारिता आणि आंतरराष्ट्रीय राजकारण अशा कोणत्यातरी विषयाला हात घालेल..पण तुझ्या करिअरचं  हे वळण माझ्यासाठी आश्चर्यच आहे..."

" कोण सांगत शोधपत्रकारिता नुसती लिहून करता येते? मी लघुपट आणि माहितीपट करण्यापासून सुरु केली माझी कारकीर्द...स्थानिक कार्यक्रमात आणि महोत्सवांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला...मग पोटापाण्याचा उद्योग म्हणून चित्रपट समीक्षण लिहा, नाटकांवर लेख लिहा हे सगळं सुरु केलं आणि बरोबरीने माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा सुरु केला..."

" स्वप्न?"

" मला काश्मीरवर प्रदीर्घ माहितीपट तयार करायचा आहे. अथपासून इतिपर्यंत. हजारो वर्षाचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान मला लोकांसमोर आणायचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ' भारत-एक खोज ' च्या धर्तीवर काश्मीरची खोज करायची आहे. काश्मिरी लोकांचा वंश, त्यांचे आता हळूहळू लुप्त होतं चाललेले पारंपरिक आचारविचार, त्यांची काश्मिरीयत लोकांसमोर आणायचीय...आहे ते आहे तसं दाखवायचं. लोकांनी ठरवावं त्यात काय योग्य आणि काय अयोग्य...मी त्यांना काश्मीर 'दाखवणार'...समजावणार नाही. "

मला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. त्याच्या अंतःकरणात एक उत्तुंग स्वप्न होतं. हिमालयाच्या कुशीत जन्मलेला आणि वाढलेला हा मुलगा त्या हिमालयाला साजेशी महाप्रचंड महत्वाकांक्षा बाळगून आपल्या ध्येयामागे वेड्यासारखा धावत होता. त्याच्याकडे काश्मीरवरच्या माहितीचं भंडार होतं. आपल्या लॅपटॉपमध्ये तो सतत त्या माहितीचं वर्गीकरण, सुसूत्रीकरण आणि एकत्रीकरण करत बसलेला दिसे. दुबईमध्ये त्याच्या येण्याचं कारण होतं इथले चित्रपट महोत्सव. काश्मीरच्या कोणत्याशा साप्ताहिकाचा आणि वर्तमानपत्राची तो आंतरराष्ट्रीय चित्रपट-लघुपट-माहितीपट यावर स्तंभलेखन करत असे. अर्थात ते काम शक्य तितक्या लवकर संपवून त्याचा मोर्चा त्याच्या 'काश्मीर' कडे वळे. 

त्याच्यामुळे मला चित्रपट बघण्याची एक वेगळी 'दृष्टी' मिळाली. सवयीमुळे तो एक-दोन वेळा एखादा चित्रपट बघून त्याचं अप्रतिम समीक्षण लिहू शके. मी एकदा त्याला त्या बाबत छेडल्यावर त्याने आपल्या अनुभवाचा खजिना रिता करायला सुरुवात केली.

" मला माझ्या एका मित्राने हा गुरुमंत्र दिला...चित्रपट अनेक वेळा बघ आणि प्रत्येक वेळा त्याच्या वेगवेगळ्या बाबींकडे लक्ष दे. पहिल्यांदा बघशील तेव्हा तुला तो समजेल. मग फक्त दिग्दर्शकाच्या दृष्टीने तो पुन्हा बघ, मग अभिनेत्याच्या, मग संकलकाच्या, मग छायाचित्रणाच्या...आणि दर वेळी ज्या उद्देशाने बघतोयस, तो सोडून इतर गोष्टी मुद्दामून दुर्लक्षित कर. मग तुला समीक्षण सुरेख लिहिता येईल...आता मला एक-दोनदा बघुनही या सगळ्याचा चांगलं अंदाज येतो पण सुरुवातीला काही चित्रपट मी वीस-बावीस वेळा बघितलेयत..."  

एकदा त्याच्या एका विशेषांकाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी 'काश्मीर' या विषयावरचे महत्वाचे चित्रपट आणि त्यावरचा प्रदीर्घ  समीक्षण एकत्र बसून लिहिलं. त्यात जुन्या काळच्या 'काश्मीर की कली' ' जब जब फूल खिले' सारख्या तद्दन गल्लाभरू चित्रपटांपासून ते थेट आत्ताच्या ' रोजा ' ' मिशन काश्मीर' ' फना' सारख्या मसालापटांपर्यंत अनेकांच्या समीक्षा त्याने मांडल्या होत्या.त्याबरोबरच 'गुल गुलशन गुल्फाम' ,'भारत एक खोज'  सारख्या दूरदर्शनवरच्या मालिका, ' काश्मीर १९९०' , 'पॅराडाईज लॉस्ट ' सारखे माहितीपट अशा अनेक अंगांनी काश्मीरवर त्याने लिहिलेलं होतं. काही ठिकाणी सडेतोड, काही ठिकाणी सामंजस्यपूर्ण तर काही ठिकाणी चक्क गंभीर तत्त्वज्ञानाच्या बाजूला झुकणारं त्याचं विवेचन म्हणजे संशोधन करून एखाद्या विषयावर किती मुद्देसूद लिहिता येऊ शकतं याचा उत्कृष्ट नमुना होतं. 

काश्मीरच्या राजकीय घडामोडींचं केंद्र असणाऱ्या लाल चौकात काही अघटित घडलं आणि त्याच्या त्या प्रदीर्घ लेखाला प्रकाशित करण्याची हिम्मत त्या वर्तमानपत्राच्या आणि साप्ताहिकाच्या संपादकाला दाखवता आली नाही. त्यांनी फराझला राजकीय संदर्भ काढून त्या लेखाला फक्त 'चित्रपट आणि मनोरंजन' या चौकटीत बसवायला सांगितलं आणि फराझ संतापला. माझ्या समोर त्याची त्या संपादकांबरोबर आळीपाळीने बाचाबाची झाली आणि त्याने फोनवरच राजीनामा देऊन विषय संपवला. 

" बंदूक हातात घेतली तर गोळी चालवायची हिम्मत पण ठेवायला हवी...यांना बंदूक घेऊन नुसते फोटो काढायची हौस...चालवायची वेळ आली की आधी पळून जातात डरपोक..." फराझच्या कपाळावरची नस ताडताड उडत होती. त्याला शांत करता करता माझ्या नाकी नऊ आले. मला त्याला खूप सांगावस वाटत होतं, की प्रत्येकाला डोक्यावर कफन बांधून जगता नाही येत...कुटुंब, जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे माणूस बरेचदा अनिच्छेने का होईना, पण धोपटमार्ग स्वीकारतो...पण फराझचा राग शांत होईपर्यंत काही शक्य नव्हतं. 

पुढच्या चार पाच दिवसात अचानक त्याने आपण भारतात परतत असल्याची वर्दी दिली. दोन्ही ठिकाणाहून राजीनामा दिल्यामुळे परत जाणं भाग होतं. परत गेल्यावर स्वतःचं वर्तमानपत्र अथवा वेबसाईट सुरु करून आपलं काम आपल्या मनासारखं करायची इच्छा त्याने माझ्याकडे बोलून दाखवली. मला त्यातले धोके दिसत असूनही मी त्याच्या हिमतीकडे बघून त्याला शुभेच्छा दिल्या. संदर्भ गोळा करायला, संकलन करायला अथवा माहिती काढल्यावर त्याचं सुसूत्रीकरण करायला मदत करायची इच्छासुद्धा दर्शवली. त्यानेच तर मला मागच्या एक-दोन महिन्यात त्याची ती कला शिकवलेली होती...त्याने हसून होकारार्थी मान हलवली. तीन दिवसांनी त्याला मी विमानतळावर सोडायला गेलो. त्या वेळी मला यत्किंचितही कल्पना नव्हती, की माझी या हरहुन्नरी माणसाशी झालेली ती शेवटची भेट ठरेल....

काही महिन्यांनी समोरच्या काकांनी मला बोलावून घेतलं आणि फराझ गेल्याची धक्कादायक बातमी दिली. काश्मीरमध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोटात त्याचा अकाली मृत्यू झाला होता. वयाच्या ऐन तिशीत एका उमद्या रसरशीत व्यक्तिमत्वावर काळाने घाला घातला होता. आपल्या जन्मभूमीतच आपली अखेर व्हावी, ही त्याने मला अनेकदा बोलून दाखवलेली इच्छा अशा विचित्र पद्धतीने पूर्ण झाली होती. विस्तवाशी खेळ करण्याची जात्याच आवड असलेला हा कलंदर आपली अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा त्याचं काश्मीरच्या एखाद्या गावात हिमालयाच्या गर्भातून जन्म घेईल आणि साद घालणाऱ्या हिमशिखरांना आपल्या माहितीपटाच्या माध्यमातून कवेत घेण्याचा प्रयत्न करेल अशी मला सारखी शंका येत होती.त्याची नाळ त्या भूमीशी जोडली गेलेली होती, कारण त्याची नाळ त्या भूमीशी जोडली गेलेली होती. काश्मीर हाच त्याचा स्वर्ग होता.   

आज माझ्या स्मृतींव्यतिरिक्त फराझच्या काश्मीरविषयीच्या कामाच्या संदर्भातलं माझ्याकडे काहीही उरलेलं नाही. त्याने भरभरून सांगितलेल्या गोष्टी, त्याच्या स्वप्नातली ती चिनारची झाडं, ते दाल सरोवर, त्या शिकारा, ती बर्फ़ाच्छादित शिखरं, त्या काश्मीरच्या गल्ल्या आणि छोटीशी टुमदार घरं माझ्या मनात जरी काश्मीरचा विलोभनीय देखावा निर्माण करत असली, तरी त्या देखाव्याला असलेल्या दुःखाच्या किनारीची जाणीव सुद्धा मला सतत होत असते. मी एकदाही ज्या ठिकाणी गेलो नाही, त्या ठिकाणच्या स्मृती अशा पद्धतीने माझ्या मनात जिवंत करण्याचं काम करून गेलेला माझा हा काश्मिरी मित्र आजही माझ्या मनात एक हळवा कोपरा बनून जिवंत राहिलेला आहे. पुराणात काश्मीरच्या भूमीवर देवदेवता, यक्ष आणि अप्सरा अवतारात असत, अश्या आख्यायिका आहेत. माझा हा मित्र त्याचं यक्षांपैकी एखादा शापित यक्ष तर नसेल? 

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. दुसऱ्या दिवश