Skip to main content

कुकरी बहादूर


दुबईच्या माझ्या वास्तव्यात मी काम केलेल्या जवळपास सगळ्या ऑफिसमध्ये मला असंख्य वल्ली भेटलेले आहेत. वेगवेगळ्या देशाचे, जातीचे, धर्माचे आणि वंशाचे लोक या अनोख्या देशात कामाच्या निमित्ताने आलेले असल्यामुळे हा देश एका अर्थाने 'सर्वसमावेशक' देश बनलेला आहे. इथे सगळेच जण या ना त्या रूपाने 'एकाच उपऱ्या जातीचे' असल्यामुळे अनौपचारिकतेच्या सगळ्या भिंती हळू हळू गळून जाऊन एकमेकांशी संवाद सुरु व्हायला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. माझ्या पहिल्यावहिल्या ऑफिसमध्येही अशा सगळ्या वातावरणात आठवड्याभरातच मी बऱ्यापैकी रुळल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर देशात एकटा राहायची माझी पहिली वेळ माझ्यासाठी विशेष तापदायक ठरली नाही. 

ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांपेक्षा आधी परिचय झालेला ' रेशम ' हा आमच्या ऑफिसचा ' टी बॉय '. नेपाळमधल्या पोखरा शहरातून चार-पाच वर्षांपूर्वी दुबईला आमच्या ऑफिसमध्ये आलेला हा मनुष्य अतिशय चुळबुळ्या आणि बडबड्या होता. सुरुवातीला नावामुळे मला 'मादी' वाटलेला हा 'नर' खरं तर 'नरपुंगव' सदरात मोडणारा होता. अंगापिंडाने मजबूत आणि काटक असलेला हा नेपाळी वीर खरं तर पोलिसाच्या किंवा सैनिकाच्या नोकरीत असायला हवा होता.पहिल्याच दिवशी ऑफिसच्या 'पॅन्ट्री' मध्ये ओट्यावर चढून तिथून एक पाय खिडकीच्या चौकटीवर ठेवून तशाच अधांतरी अवस्थेत लटकत त्याने ट्यूब बदलायची कसरत केलेली बघून हा माणूस डोंगरांमध्ये यथेच्छ बागडलेला आहे हे समजायला मला वेळ लागला नाही. साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची, डोंगरदऱ्यातल्या माणसांचा असतो तसा रापलेला लालसर चेहरा, व्यायाम ना करताही नैसर्गिक पिळदार शरीरयष्टी आणि तंबाखू-गुटखे खाऊन घाणेरडे झालेले दात अशा दिव्य रूपातल्या या ओबडधोबड माणसाचं नाव ' रेशम ' असणं हाच एक मोठ्ठा विनोद होता.  

ऑफिसच्या पहिल्या दिवशी त्याने माझ्यासाठी चहा आणल्यावर आजूबाजूच्या लोकांमध्ये खसखस पिकली. मला नक्की काय चाललंय, याचा पत्ता लागत नव्हता, पण त्या चहाचा पहिला घोट घेताक्षणी माझं तोंड कसनुसं झालं.  जानेवारी महिन्याच्या त्या थंडीत गरमगरम वाफाळलेला चहा घ्यायच्या सकाळच्या त्या वेळी 'मांजरमुतवणी' सारखा कोमट  आणि गुलाबजामच्या पाकात दूध आणि चहा पावडर उकळून केल्यासारखा गोड मिट्ट चहा पदरात पडलेला असल्यामुळे माझी ऑफिसमधली पहिलीच सकाळ 'साजरी' झाली होती. माझा तोंड बघून आजूबाजूच्यांनी मला पुढचा घोट घेण्यापासून थांबवलं. रेशमच्या हातचा चहा घेण्यापेक्षा स्वतः जाऊन चहा तयार करून घ्यायचा सल्ला सगळ्यांनी मला दिला. 

" अरे पण हा 'टी बॉय ' आहे ना?" मी आश्चर्याने विचारलं. 

" आहे...पण त्याला ज्या चवीचा चहा आवडतो, तसाच चहा इतरांना मिळतो. इतका अघोरी गोड चहा पिऊन आपल्या शरीराची ' उसाची कांडं '  करून घेण्यापेक्षा स्वावलंबी झालेलं बरं...आणि हो, चुकूनही कॉफी करायला सांगू नकोस त्याला..."

" का? त्यात पण साखर भरभरून?"

" नाही...त्यात एक कण साखर नसते...पण त्यात दालचिनी, लवंग आणि मिरी घालतो तो...आणि दूध घालत नाही.."

" वेडा आहे का हा? ही अशी कॉफी कोण पिणार?"

" अरे समजून घे....रात्रीच्या 'दवादारूचा' उतारा असतो ना तो... स्वतः ज्या चवीचं खाणार पिणार ते आणि तेच तो इतरांना देणार...नियमच आहे तसा त्याचा..अपवाद फक्त आपले बॉस." 

या रेशमच्या एकेक सुरस कहाण्या ऐकून माझी पहिल्याच दिवशी चांगलीच करमणूक होतं होती. हा माणूस महा उद्योगी होता. इलेकट्रिशिअन, प्लम्बर, सुतार ( कदाचित लोहार आणि कुंभार पण असेल, कोण जाणे...) अशा अनेक रूपांमध्ये तो ऑफिसभर वावरत असे. अधून मधून सफाई, कागदकपटे गोळा करून कचऱ्याच्या पिशवीत कोंबणे, दिवसातून चार-पाच वेळा सुगंधी 'रूम फ्रेशनर' ऑफिसभर फवारणे, लोकांच्या प्रिंट्स आणून देणे, वेळप्रसंगी 'सबमिशन डॉकेट' चं बाइंडिंग करणे अशा सगळ्या कामात हा प्राणी पारंगत होता. दुबईचं लायसन्स नव्हतं म्हणून, पण नेपाळला सायकलपासून ट्रकपर्यंत सगळ्या आकाराची आणि प्रकारांची वाहनं त्याने चालवलेली होती. गाड्या दुरुस्त करण्याच्या गॅरेजपासून ते नेपाळी खानावळीच्या भटारखान्यापर्यंत अनेक जागी त्याने तऱ्हेतऱ्हेची कामं केली होती. दर्यारोहण करणाऱ्या लोकांना हिमालयातल्या वेगवेगळ्या शिखरांच्या 'बेस कॅम्प' पर्यंत घेऊन जाणं असले धाडसी प्रकार सुद्धा चार पैसे मिळवायच्या उद्देशाने त्याने केलेले होते. पण घरची गरिबी आणि एकूणच देशाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे बारावीपर्यंत शिक्षण आणि अनुभवाची भली मोठी शिदोरी या दोन उपलब्धी आपल्या 'सी.वी.' वर वागवणारा हा इसम इतरांप्रमाणे अखेर चार पैसे कमवायच्या उद्देशाने आपल्या निसर्गरम्य गावातून थेट रणरणत्या वाळवंटात आलेला होता.  

" शॉबजी , मेरे पास पैसा होता तो मै प्लेन उदानेवाला था... " 
एकदा तंबाखू मळत मळत त्याने माझ्याशी त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांचा पाढा वाचायला सुरुवात केली.

 " सोफेद कोपडा मे प्लेन का ड्रायवर लोग एकदम हिरो लॉगता है ना?" 

" अरे उनको पायलट बोलते है रे..." मी त्याला सामान्यज्ञान पुरवलं. 

" बोडा नाम दिया तो क्या ड्रायवर ड्रायवर नहीं राहेगा? और मे दुबई आया ताब देखा...सुन्दार सुन्दार लॉडकी भी हुता है प्लेन मे...कितना मोजा आता होगा ना? " हे बोलून त्याने हातातली तंबाखू तोंडात भरली. अचानक त्याची गाडी आकाशातून जमिनीवर आली. " बोडे शोब को बोलना मोत...तोम्बाकू खाया मै...वो गुषा कोरता है..." मी त्याला चुगली न करण्याचं आश्वासन देताच पुन्हा साहेब विमानातून आकाशात उडाले. " शॉबजी, कितना मोजा आता होगा ना...दारू फ्री, सुन्दार सुन्दार लॉडकी आजू बाजू और घोर से दो-दो हॉफ्ता दूर घूमने का कोम्पनी पोगार भी देता है..." त्याच्या या विलक्षण 'स्विच ऑन - स्विच ऑफ' कडे बघून मी अचंबित झालो. भल्या भल्या नटांना जे वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येतून साध्य होतं, ते या रेशमने किती सहज आत्मसात केलेलं होतं, याचं मला नवल वाटलं. 

हा माणूस जात्याच स्वप्नाळू होता. ऐश्वर्य आणि लावण्याचं त्याला प्रचंड आकर्षण होतं. अनेक वेळा मनातल्या मनात कसलेसे मांडे खात तो आपल्या धुंदीत बसलेला असे आणि कधी कधी त्याबद्दल कचकावून दम सुद्धा खात असे. तंबाखूमध्ये चुना मळून झाल्यावर उरलेली भुकटी फुंकल्याच्या बेफिकिरीने तो मिळालेला दमसुद्धा फुंकून टाकत असे. आपल्या स्वप्नांच्या विश्वात पुन्हा एकदा रममाण व्हायला त्याला काही सेकंदांचा अवधी पुरत असे.

त्या वर्षी दुबईमध्ये रमझानची सार्वजनिक सुट्टी शुक्रवार-शनिवारला जोडून आल्यामुळे आम्हाला पाच दिवसांची सलग रजा मिळाली होती. त्या पाच दिवसात मी एकट्याने आणि ऑफिसच्या लोकांसोबत अक्खा देश पालथा घातला. पुन्हा ऑफिसमध्ये रुजू झाल्यावर आम्ही एकमेकांशी आमचे सुट्टीच्या अनुभवांची चर्चा करत बसलो असताना रेशम हातात त्याचा तो अघोरी चहा घेऊन आला. आमच्यातल्या एकाने त्याला छेडायच्या उद्देशाने मुद्दाम त्याला प्रश्न केला...

" रेशम, तू कुठे गेला होतास रे? आंम्हाला समजलं तू सकाळी जायचास आणि संध्याकाळी यायचास...कोणी हवाई सुंदरी पटवलीस का? "

रेशमने अभिमानाने छाती फुलवून आपापल्या सुट्टीची कहाणी सांगायला सुरुवात केली. " पांच दिन मे पांच लोम्बा ट्रिप बनाया...शारजा, फुजेरा, रास आल खिमा, अबू धाबी ऑर ओल एन...तुमको क्या लोगा, रेसम घोर पे बेठेगा?"

" अरे वा...क्या क्या देखा? " त्याला आम्ही प्रतिप्रश्न केला. 

" बोहोत कूच...बिल्डिंग देखा, बोगीचा देखा, पाणी देखा...सांड भी देखा..."

" सांड? अरे अल एन  डेरी मे गया था क्या ? और डेरी मे सांड नही होता है रे...गाय और भैंस होती है...फरक नाही समझता अभी भी?" आमच्यातल्या एकाने हसत हसत त्याची खेचायचा प्रयत्न केला. 

" शॉबजी , मे डेरी मे नहीं गया...क्या मोझाक कोर्ते हो..."

" तो सांड कहा देखा?" 

" शॉबजी, इस मुलुख मे जहाँ देखो वाहा सांड नही है? क्या बात कोर्ते हो?"

आमच्यापैकी एकाने ' बहुतेक याची कालची उतरली नाहीये अजून' अशी कुजबूज सुरु केली. शेवटी एकाने त्याला मुद्दाम पुन्हा विचारलं, " सब जगह सांड है तो दिखाव...खिडकी से बाहर देखा तो दिखना चाहिये ना?" 

रेशमने आम्हाला खिडकीतून जे दाखवलं, ते बघून आम्ही जवळ जवळ पंधरा वीस मिनिट हसत होतो. त्याला 'वाळू' या अर्थी 'सॅण्ड' म्हणायचं होतं, पण नेपाळी उच्चारांमुळे अर्थाचा अनर्थ झाला होता. त्यानंतर घुश्श्यात येऊन रेशमने आठवडाभर आमच्याशी बोलणं बंद केलं होतं. 

दर शुक्रवारी हा माणूस बर दुबईच्या मीना बाजार भागातल्या सीडी विक्रेत्यांच्या दुकानापाशी घासाघीस करताना दिसायचा. नेपाळी चित्रपट, मारामारी किंवा प्रणयप्रसंग भरभरून असलेले इंग्रजी चित्रपट, हिंदी गाणी अशा विविध गोष्टींचा आठवड्याचा 'स्टॉक'  तो आपल्या राहत्या खोलीवर घेऊन जायचा. त्याने ऑफिसच्याच एकाकडून जुना कामचलाऊ लॅपटॉप घेतलेला होता. त्यात तो हा सगळा स्टॉक घेऊन आपल्या एक-दोन मित्रांसोबत तासंतास एकामागून एक सीडी डोळ्यांखालून घालायचा. दुबईला लायसन्स नसेल, तर वारुणी घरात ठेवणं महागात पडू शकेल हे माहित असूनही आपल्या अशाच 'जुगाडू' पद्धतीने त्याने ती मिळवायची सोय केली होती. त्यानेच खुलासा  केल्याप्रमाणे त्याच्या त्या टग्या मित्रांपैकी एक जण हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी असल्यामुळे तिथल्या लोकांनी अर्धवट सोडलेल्या बाटल्या तो मित्र हळूच घेऊन यायचा. उंची दारू पिऊन आणि त्याबरोबर हॉटेलमधूनच आणलेल्या शेंगदाण्याचा चकणा खाऊन हे तीन-चार मित्र आपल्या रूमवर प्रत्येक 'वीकएंड' धमाल करायचे. 

या माणसाच्या आयुष्याला रुळावर आणायचं काम एका विचित्र प्रसंगाने केलं. आमच्या ऑफिसमध्ये कम्प्युटर दुरुस्त करायला आलेल्या एका मनुष्याशी त्याची कशावरूनतरी बाचाबाची झाली. त्या मनुष्याने रेशमला काहीबाही बोलून शेवटी त्याला ' त्याच्या मर्यादेत ' राहायला सांगितलं. एक साधा टी बॉय असून एका नेटवर्किंग इंजिनिरसमोर मिजास मारतो म्हणजे काय, अशा आविर्भावातलं त्याचं ते बोलणं रेशमला अतिशय लागलं. दुसऱ्या दिवशी चहा घ्यायला गेलो असताना त्याने माझ्यासमोर दातओठ खात झालेला प्रसंग कथन केला. 

" रेसम का औकात नोही है शॉबजी ? मे क्या कुटा है या बिल्ली है? वो xxxx मेरेको क्या क्या बोला...बोडा साब है ना? " रेशम संतापाने थरथरत बोलत होता. 

" रेशम, शांत हो आणि एक विचार कर...त्याला ते बोलणं शक्य होतं कारण तू त्याच्यापेक्षा कुठेतरी कमी होतास ना? " मी समजावायचा प्रयत्न केला. " तो असेल उद्धट..त्याला बोलायची अक्कल नसेल...तू इतका कशाला विचार करतोयस या सगळ्याचा?" 

" नोही शॉबजी....मे उस्का ओकाद उसको दिखाईगा...पोसुपोतीनाथ कोसम..." आता हा प्राणी आपली कुकरी काढून त्या कोण्या इंजिनिअरचा कोथळा काढणार की काय, अशी मला शंका आली. त्याला थोडा वेळ शांत करायचा प्रयत्न करून शेवटी मी तिथून काढता पाय घेतला. थोड्या वेळाने रेशम आमच्या बॉसच्या केबिनमधून बाहेर येताना तेव्हढा आम्हाला दिसला. त्यानंतर तो शांत झाला असल्यामुळे कदाचित आमच्या डिरेक्टर साहेबांनी त्याची समजूत घातली असावी असा आमचा समाज झाला. 

पुढच्या काही महिन्यात रेशम ऑफिसच्या वेळेनंतर कुठेतरी गायब व्हायला लागला. अगदी शुक्रवार-शनिवारी सुद्धा त्याचा ठावठिकाणा कुठे आहे, हे समजणं बंद झालं. ऑफिसमध्ये त्याच्याविषयी कुजबूज सुरु झाली. काही दिवसांनी नेपाळी - इंग्रजी भाषेचा शब्दकोश त्याच्या खिशात दिसायला लागला. फावल्या वेळात कोणत्याशा शब्दांचे अर्थ शोधात तो बसलेला दिसे. ऑफिसच्याच एका बिघडलेल्या कॅम्प्युटरचा सीपीयू तो घेऊन गेला. या सगळ्या गोष्टीचा उलगडा आम्हाला काही महिन्यानंतर झाल्यावर आमच्यापैकी एकूण एक जण आश्चर्याच्या धक्क्याने कोलमडायचाच बाकी होता. 

रेशमने त्याच्या ओळखींमधून कुठल्याशा कम्प्युटरच्या दुकानात एकाशी दोस्ती वाढवून कम्प्युटरचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. मशीन दुरुस्त करण्याचा अनुभव गाठीला असल्यामुळे त्याला हे नवा मशीन आतून बाहेरून समजणं फारसं अवघड गेलं नव्हतं. त्याबरोबर त्याने 'नेटवर्किंग' चा अभ्यास सुद्धा सुरु केला होता. इंग्रजी सुधारण्यासाठी शब्दकोश आणि खोलीतल्या इंग्रजी चित्रपटांच्या सीडी त्याच्या कामी आल्या होत्या. सोबतीला त्याचं दुकानाच्या कामांमध्ये जमेल तसा हातभार लावून त्याने कम्प्युटर आणि नेटवर्किंग या विषयाचा सखोल अभ्यास प्रात्यक्षिकांसकट पूर्ण केला होता. ऑफिसमध्ये त्याने आता नेटवर्किंगची धुरा आपल्या हातात घेतली होती. पुढच्या काही महिन्यात त्याच्या कामाची आणि त्या विषयावरच्या माहितीच्या परिपूर्णतेची खात्री पटल्यावर आमच्या ऑफिसने त्याला पूर्णवेळ नेटवर्किंगच्या कामावर रुजू केलं .

" शॉबजी, मे बोला ना...वो बोडा इंजिनीर को मे मेरा भी ऑर उस्का भी ओकाद दिखाईगा...आज होमारे बोडे शॉबजी ने उस्का कॉन्ट्रॅक्ट निकाल दिया..." रेशम अभिमानाने मला सांगत होता. आता त्याच्या अंगावर टी-बॉय चा पोशाख जाऊन शर्ट, पंत आणि टाय असा 'साहेबी' पोशाख आला होता. ऑफिसचा तो एक महत्वाचा 'शॉबजी' झाला होता. 

काही वर्षांनी मी ऑफिस सोडल्यानंतर आमच्यातला संवाद कमी कमी होतं गेला. अनेक वर्षांनी अचानक एके दिवशी फेसबुकवर त्याची 'request' आली आणि मी चमकलो. मग रीतसर नंबर देऊन त्याच्याशी मी अनेक वर्षांनी बोललो. तो दहा वर्ष नेटवर्किंगचं काम करून, शिवाय त्याच विषयातल्या कोणत्याशा परीक्षा देऊन हातात चांगल्या चार-पाच 'सर्टिफिकेट्स' ची औकाद झाल्यावर नेपाळला आपल्या गावी परतला होता. तिथल्या म्युन्सिपालिटीपासून ते खाजगी कार्यालयांपर्यंत त्याच्या ' रेशम नेटवर्किंग' चा व्यवसाय पसरलेला होता. 

" शॉबजी , मेरा शादी हो गया...एक बच्चा भी है..." मला ' बच्चा ' हा शब्द त्याच्या ' नेपाळी उच्चारात ' ऐकायला विचित्र वाटला. " फेसबुक पे देखो...फोटो है..." त्याने उत्साहाने बोलायला सुरुवात केली. पंधरा मिनिटं तो  भरभरून बोलला. शेवटी मीच त्याला थांबवून त्याची रजा घेतली आणि त्याचं फेसबुक प्रोफाइल बघायला सुरुवात केली. त्याच्या कुटुंबाच्या फोटोकडे बघून मला अतिशय आनंद झाला. 

त्या फोटोत रॉयल नेपाळ एयरलाईन्सची हवाई सुंदरी असलेली त्याची बायको आणि तिच्याबरोबर शुभ्र पांढऱ्या सूटमध्ये रेशम ऐटीत उभा होता. 

Comments

  1. आम्ही आपले लेख वापरू का...
    https://iyemarathichiyenagari.com/
    या आमच्या वेबसाईटवर
    फोन 9011087406

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. दुसऱ्या दिवश