संगीताची आवड असलेला माणूस बरेच वेळा स्वतःला गाता गळा नसला तरी संगीताचा 'कान' असल्यामुळे सतत चांगल्या गायकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत असतो. माझ्यासारख्या संगीत वेड्याला कुठेही गेलं तरी चांगलं संगीत कानावर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या जागेशी नाळ जुळल्यासारखी वाटते. त्या संगीताला भौगोलिक अथवा व्याकरणात्मक बंधन नसतं. अरबी संगीतकारांच्या रबाबात अथवा मिझमारमध्ये उमटणारे सूर खरे असले, तर त्याची अनुभूती घ्यायला आपल्याला आपण अरबी नसल्याची अडचण भासत नाही. सिंगापूरमध्ये कोलिनटॉन्ग ऐकताना किंवा चीनमध्ये डिझीवर वाजवले जाणारे संथ सूर ऐकताना तंद्री लागतेच लागते. एका आफ्रिकेच्या 'ग्रुप' चा जेमबे आणि रॅटल्सच्या जुगलबंदीचा श्रोता होताना आपण आफ्रिकेत कधीही न गेल्याचा 'परकेपणा' जराही जाणवत नाही. याच वेडामुळे असेल, पण दुबईला आल्यावर माझ्या ओळखीतल्या एका मित्राच्या 'गायनाच्या' वर्गात मी पेटीवर सूर धरण्यासारखी छोटी छोटी कामं करायच्या निमित्ताने गेलो आणि तिथला एक श्रोता होऊन माझी 'ऐकण्याची' हौस भागवायला लागलो. त्या वर्गाचे शिक्षक कर्नाटकी संगीताचे जाणकार असल्यामुळे...