Skip to main content

धर्मवेडा नास्तिक

धर्म हा विषय म्हणावा तर जिव्हाळ्याचा आणि म्हणावा तर त्रासाचा. वेगवेगळ्या लोकांचा धर्माविषयीचा दृष्टिकोन त्यांच्या कुटुंबाच्या आणि आजूबाजूच्या परिस्थितीच्या अनुषंगाने तयार होत असतो. पुढे जगाचा अनुभव घेऊन त्यांच्या त्या दृष्टिकोनात एक तर नव्या ज्ञानाची भर पडते अथवा धर्माविषयी अनास्था तयार होते. खऱ्या अर्थाने एक अतिशय संवेदनशील आणि नाजूक असा हा विषय एखाद्या व्यक्तीबरोबर तासनतास पिंजून काढता येईल, असा मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. किंबहुना धर्म हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आयुष्यापर्यंत मर्यादित ठेवायलाच विषय आहे, असं माझं प्रामाणिक मत असल्यामुळे स्वतःहून या विषयाला मी सहसा चारचौघात हात घालत नाही, पण ' कबीर' भेटल्यावर मात्र माझ्या या सगळ्या निर्बंधांना मी त्याच्याशी संभाषण करताना ठरवून तिलांजली द्यायला लागलो.

हा माणूस मला भेटला तो एका विशिष्ट कामानिमित्त. मी कामानिमित्त सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा चांगी विमानतळावर 'पासपोर्ट कंट्रोल' च्या रांगेत हा माझ्यापुढे उभा होता. पासपोर्ट चेक होऊन आम्ही पुढे गेलो, तेव्हा चालताना त्याच्या कोटाच्या खिशातून त्याच्या नकळत त्याचं पाकीट पडलेलं मला दिसलं. मी त्याला बोलावून त्याच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिली आणि आभार मानताना त्याने मला " वेळ असेल तर कॉफी घ्यायची एक?" म्हणून विचारलं. प्रवासाचा शीण होताच, त्यात अर्धवट झोप झाल्यामुळे डोळ्यांवर गुंगी सुद्धा होती. अनोळखी देशात आपसूक एक देशमित्र आपणहून कॉफीसाठी विचारतोय तर का संधी सोडा असं विचार करून मी होकार दिला.

सामान घेऊन विमानतळाबाहेर आल्यावर तिथल्या एका छोट्याशा कॉफी शॉपमध्ये आम्ही एक कोपरा पटकावून सोफ्यावर 'सांडलो'. त्याच्या चेहऱ्यावरून तो एक तर कामामुळे बरेच तास झोपला नसावा किंवा विमानातला 'पाहुणचार' त्याला झेपला नसावा अशी दाट शंका मला आली. त्याचे डोळे चांगलेच लाल झालेले होते. शेवटी कॉफी आल्यावर दोन-तीन घोट घेऊन स्वारी ताजीतवानी झाली आणि आमच्या गप्पांचा श्रीगणेशा झाला.

पुढच्या दहा मिनिटात मला कबीरने जे सांगितलं, ते ऐकून माझी झोप उडाली. प्रवासाचा शीण, त्या आठवड्यात अंगावर असलेला काम अशा सगळ्या गोष्टी मी काही वेळ विसरलो आणि या माणसाला सिंगापूरच्या वास्तव्यात जितका शक्य असेल तितका भेटायचं असं स्वतःला मनातल्या मनात बजावायला लागलो. कबीर पेशाने वकील, व्यवसायाने समाजशास्त्रज्ञ आणि विचारांनी 'अधार्मिक' होता. गेल्या चार वर्षांपासून जगभराच्या धर्माचा आणि तत्वज्ञानांचा त्याने अभ्यास तो त्याचा पूर्णवेळ काम म्हणून करत होता आणि त्या विषयावर त्याला डॉक्टरेट करून पुढे काहीतरी भरीव लिखाण करायचं होतं.

माझ्यासारख्या 'माणूसवेड्या' व्यक्तीसाठी या विलक्षण माणसाबरोबर वेळ घालवणं म्हणजे पर्वणी होती. अर्थात माझ्या सुप्त इच्छा त्याच्यासमोर लगेच उघड्या न पाडता मी त्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कामानंतर भेटण्यासंबंधी विचारलं आणि त्याने ते मान्य केल्यावर आम्ही तिथून उठलो. दोघांच्या राहत्या ठिकाणांमध्ये बऱ्यापैकी अंतर असलं, तरी सिंगापूरला सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अतिशय चोख असल्यामुळे वेळेत कुठेही पोचणं काही फारसा अवघड वाटत नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठीक सात वाजता आम्ही तिथल्या ' बुद्धा टूथ रेलिक ' मंदिरात भेटलो.

कबीर आपल्या हातातल्या वहीत काय काय टिपून घेत होता. तिथल्या भिक्खूना, मंदिरात आलेल्या इतर लोकांना आणि ज्यांना ज्यांना म्हणून बोलता करता येईल, त्यांना त्यांना तो काय काय विचारून आपल्या ज्ञानात भर घालत होता. सध्या बुद्धिस्ट धर्माचा खोल अभ्यास चाललेला दिसतोय, हे मी ताडलं आणि त्याच्याबरोबर एक 'ज्ञानोत्सुक' श्रोता म्हणून मी सुद्धा माझी भटकंती सुरु केली.

" चिनी बुद्धिझम आणि भारतीय बुद्धिझममध्ये किती फरक आहे बघ.... आपल्याकडे बुद्धिझममध्ये तत्वज्ञानावर भर दिला गेलेला आहे, कारण हिंदू विचारांचा बुद्धिझमवर प्रभाव होता. चिनी लोकांनी बुद्धीझमच्या व्यावहारिक बाजूवर जास्त भर दिला कारण ताओ तत्वज्ञानाचा प्रभाव तिथे जास्त होता....." माझ्यासाठी हे सगळं ऐकणं म्हणजे मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता.

थोड्या वेळाने आम्ही पोटपूजा करायला बसलो तेव्हा मी त्याला धर्म, देव आणि तत्वज्ञान या विषयांवरचे त्याचे विचार आणि त्याने केलेल्या अभ्यासावरून त्याने काढलेले निष्कर्ष याविषयी बोलायची विनंती केली. त्याने एक कॉफीचा घुटका घेतला, खिशातून आपला मोबाईल काढून सायलेंट मोड वर टाकला आणि मलाही ते करायला लावलं। स्वारी आता मस्त रंगात आलेली आहे, हे मी ताडलं.

" देव आणि धर्म म्हणजे काय? तुझं मत काय?" त्याने मला प्रश्न केला. मी यथाशक्ती माझ्या बाजूने उत्तर द्यायचा प्रयत्न केला।

" देव म्हणजे ती शक्ती, जी सगळ्या विश्वाला सांभाळते. कोणत्याही रूपात आपण देव बघितला तरी शेवटी ती सर्वोच्च शक्तीच आहे. धर्म म्हणजे माझ्या मते वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या देवाला अनुसरून तयार केलेली उपासनेची पद्धत..... "

" तुझं म्हणणं चुकीचं नाही, पण विचार करून बघ..... वेगवेगळ्या धर्मात देवाची व्याख्या वेगवेगळी आहे। काही धर्मांमध्ये देवाचं स्वरूप नाही, काही धर्मांमध्ये देवाचा स्वरूप आहे...काही धर्म देवाच्या जागी काही विशिष्ट गुरूंना मानतात.....म्हणजे देव ही संकल्पनाआधी तयार झाली आणि मग धर्म आला हे योग्य नाही.....त्याचप्रमाणे धर्म आधी तयार झाला आणि मग देव, हे सुद्धा पूर्णपणे खरा मानता येणार नाही....."

" मग तुझ्या मते देव आणि धर्म म्हणजे काय?"

" माणसाला श्रद्धेसाठी एक स्थान लागतं. श्रद्धा व्यक्त करायची एक पद्धत लागते. याचाच दुसरं अर्थ म्हणजे देव हे त्याचं श्रद्धास्थान आणि धर्म हि त्याची श्रद्धा व्यक्त करायची पद्धत. आता जो धर्म ज्या परिस्थितींमध्ये जन्माला आला, त्या परिस्थितींप्रमाणे त्या त्या धर्माचे ग्रंथ लिहिले गेले. तू नीट विचार कर, जिथे देवाच्या संकल्पनेला विरोध झाला, तिथे माणसांमधल्या कोणालातरी लोकांनी देवाचा दर्जा दिला. बऱ्याचशा साम्यवादी देशांमध्ये तुला दिसेल हे होताना.....कारण माझ्या मते मनुष्याची समाजशास्त्रीय उत्क्रांती अशी झालीय, कि 'श्रद्धा' त्याच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे श्रद्धा ही त्याची मूलभूत गरज आहे....मान्य करा वा नका करू!"

देव आणि धर्म या विषयावर इतक्या सोप्या पद्धतीने विवेचन केलेलं मी खरोखर याआधी ऐकलं नव्हतं. डोळस आणि व्यावहारिक पद्धतीने देव आणि धर्म या गहन विषयाची केलेली त्याची ही चिकित्सा मला या विषयावर अजून भरभरून बोलायला उद्युक्त करत होती.

" तू आस्तिक कि नास्तिक?"

" मी आस्तिक सुद्धा नाही, आणि नास्तिक सुद्धा. मी धार्मिक तर मुळीच नाही. तू म्हणू शकतोस, कि देव या संकल्पनेवर विश्वास असणारा, डोळे आणि मेंदू गहाण न ठेवलेला श्रद्धाळू आणि कर्मकांडांपेक्षा कर्मयोगावर जास्त प्रेम करणारा असा काहीसा विचित्र प्राणी आहे मी. केवळ समसमानतेच्या आंधळ्या संकल्पनांच्या मागे जाऊन किंवा अमुक ग्रंथात लिहिलेली गोष्ट कालातीत आहे अशा भ्रमात राहून मूर्खासारख्या वागणाऱ्यांचा मला राग येतो. धर्म अथवा प्रथा या संकल्पनांमध्ये 'विशुद्ध' असा काहीच नसतं, कारण मनुष्याने निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टी कधीही परिपूर्ण असू शकत नाहीत, परंतु एक अत्युच्च शक्ती म्हणून देवाकडे बघणं मला जास्त पटतं. त्या शक्तीला रूप, रंग, आकार, लिंग असा काहीही जोडायचं नाही। ती फक्त शक्ती आणि शक्तीच आहे....."

या माणसाबरोबर दोन संध्याकाळचे चार ते पाच तास इतकाच वेळ मला राहता आलं,  परंतु तितक्या कमी वेळात त्याने माझी धर्माची आणि देवाची संकल्पना कायमची बदलून टाकली. जगातल्या चाळीस-एक धर्माचा सखोल अभ्यास करून त्याने जवळ जवळ हजार पानं होतील इतका संशोधित मजकूर आपल्या टॅब्लेटमध्ये जमा केला होता. इतकं करूनही आफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा ठिकाणी नं गेल्यामुळे " हे सगळं अजून अपूर्ण आहे...." असंच तो सांगत होतं. पुढच्या तीन वर्षात चीन, जपान, दक्षिण अमेरिका, आफ्रिका अशा ठिकाणच्या भटकंतीचे त्याचे कार्यक्रम बघून मी मनोमन त्याच्या त्या चिकाटीला सलाम केला.

त्याने सिंगापूरहून प्रयाण करायच्या आधी मला फोन केला तेव्हा मी ऑफिसमध्ये काम करत होतो. त्याला भेटायला जायची मला इच्छा होती पण नेमकं काम असल्यामुळे मला ते शक्य होणार नव्हतं. फोनवर सुद्धा आम्ही चांगले पंधरा-वीस मिनिटं बोललो. त्याच्या भावी संशोधनासाठी आणि डॉक्टरेटच्या प्रबंधासाठी मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि संपर्कात राहा म्हणून त्याला विनंती केली.

" तुझ्या देवाची आणि माझ्या शक्तीची इच्छा असेल, तर नक्की पुन्हा भेटू" त्याने त्याच्या त्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला साजेसं उत्तर दिलं. अजूनही कधीतरी मला त्याची आठवण येते. एखाद्या सरकारी कामाच्या वेळी 'फॉर्म' भरायची वेळ आली, कि अजूनही 'धर्म' नावाच्या रकान्यात सरधोपट माहिती भरायच्या आधी त्याने सांगितलेल्या धर्माच्या व्यावहारिक संकल्पना आठवतात आणि त्या सर्वोच्च शक्तीला स्मरून तो रकाना कोरा सोडायची इच्छा प्रबळ होते.

त्या अवलिया माणसामुळे तर मी खऱ्या अर्थाने 'देवाधर्माच्या' आहारी गेलो होतो, नाही का?

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...