Skip to main content

गुणा

मलेशिया हा देश बघायचा योग्य आयुष्यात कधी ना कधी यावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. या देशाबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं, पण माझ्यासाठी या देशाची महत्वाची ओळख म्हणजे या देशाच्या राजधानीत क्वालालंपूरला जगातल्या सर्वात उंच इमारतींमधली एक असलेली पेट्रोनॉस टॉवर ही इमारत. खरं तर या जुळ्या इमारती आहेत, ज्या एकमेकांशी 'skybridge' ने  जोडलेल्या आहेत.वास्तुविशारद असल्यामुळे अशा जागा माझ्यासाठी तीर्थस्थळांसारख्या, परंतु बरोबर मुलगी आणि बायको असल्यामुळे माझ्यातल्या वास्तुविशारदाला मला काबूत ठेवणं भाग होतं. शेवटी क्वालालंपूरमधल्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जागा, आजूबाजूच्या पर्यटकांसाठीच्या महत्वाच्या जागा आणि प्राणीसंग्रहालय, फुलपाखरांची बाग अशा मुलीला आवडतील अश्या जागा दोन दिवस बघायच्या आणि तिसऱ्या दिवशी दुपारचे काही तास मला ते टॉवर बघायची मुभा द्यायची अशा पद्धतीचा 'सौदा' तुटला.

क्वालालंपूर ही जागा बघायला एखादी गाडी आणि त्याबरोबर एखादा माहितगार माणूस मिळावा म्हणून आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे चौकशी केली आणि थोड्या खटपटीनंतर आम्हाला एक माणूस मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाडी घेऊन येणार होता आणि आम्हाला तीन दिवस क्वालालंपूर फिरवणार होता. हा माणूस तामिळ आहे आणि आम्ही भारतीय असल्यामुळे मुद्दाम हॉटेलच्या लोकांनी त्याला आमच्या दिमतीला रुजू केलं आहे हे समजल्यावर मला त्यांचं आदरातिथ्य मनापासून आवडलं .

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता खाली हॉटेलच्या समोर एक गाडी आली. आतून एक साठीतला माणूस उतरला.डोक्याचे आणि मिशीचे केस पूर्णपणे पिकलेले, अगदी अव्वल वर्ण, गळ्यात पिवळी धमक सोन्याची साखळी, हाताच्या तीन बोटांत चांगल्या जाडजूड अंगठ्या, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, पायात पांढरे शुभ्र बूट आणि कपाळावर ठसठशीत तामिळ पद्धतीचं शुभ्र गंध असा या माणसाचा अवतार बघून चित्रपटांमध्ये बघितलेले ' डॉन ' आठवले. त्याच्या हातात त्याचं कार्ड होतं. मला भेटल्यावर ओळख वगैरे झाल्यावर त्याने ऐटीत स्वतःचं नाव मला सांगितलं. " मै गुणा. मै तामिळ है, मलेशिअन है और थोडा थोडा इंडियन भी है......" त्याच्या त्या स्टाइलवर मी फिदा झालो आणि आता हा माणूस दोन-तीन दिवस आपल्याबरोबर असणार आहे या विचाराने मी मनापासून सुखावलो.

गुणा जन्माने मलेशिअन होता. त्याचे वडीलसुद्धा मलेशियामध्येच जन्मलेले होते. त्याचे आजोबा मात्र तामिळनाडूमधल्या कुठल्याश्या खेड्यात जन्मलेले होते आणि तेव्हाच्या ब्रिटिश लोकांनी पाम-रबराच्या शेतामध्ये मजुरी करायला त्यांना मलेशियामध्ये आणलं होतं. हजारो तामिळ भारतीय लोकांप्रमाणे तेसुद्धा मलेशियामध्ये आल्यावर तिथलेच झाले आणि तिथेच त्यांनी गुणाच्या  आजीशी लग्न करून संसार थाटला.त्या संसाराला किती फांद्या फुटल्या माहित नाही, पण गुणाने पुरवलेल्या माहितीप्रमाणे त्याचं कुटुंब पन्नास-पंचावन्न लोकांचं असल्यामुळे त्याचे आजोबा 'बहुप्रसवा' होते हे मात्र नक्की.

तपासला तर 'तामिळ' हा एकच रक्तगट त्याच्या शरीरात मिळेल , इतका त्याला स्वतःच्या तामिळ असण्याचा अभिमान होता. मी 'मलेशिअन' आहे , भारतीय नाही हेसुद्धा तो तितक्याच अभिमानाने सांगत होता. एकूणच काय, तर टोकाचा अभिमान हा तामिळ लोकांमध्ये प्रकर्षाने आढळणारा स्वभावविशेष त्याच्यात पावलोपावली दिसून येत होता. ती गाडी त्याची स्वतःची होती. " तुम्ही शाकाहारी आहात म्हणून हॉटेलच्या लोकांनी सांगितलं, गुणा आहे ना, काळजी नको. इथे तुम्हाला सहजासहजी नाही मिळणार शाकाहारी जेवण......पण मी बरोबर घेऊन जाईन तुम्हाला.... " गुणा कॉलर कडक करत सांगत होता.

बाटू नावाच्या क्वालालंपूरपासून तास-दीड तास अंतरावर असलेल्या एका जागी आधी तो आम्हाला घेऊन गेला. तिथे शंभर-एक पायऱ्या चढून जाऊन वर एका गुहेत राम-सीतेच्या मूर्त्या आणि खाली उंचच उंच अस्सल सोन्याची कार्तिकेयाची उभी मूर्ती बघून भारताबाहेर भारतीय संस्कृतीच्या खुणा किती ठळक आहेत याची प्रचिती येत होती. तिथे मोकाट माकडांचा प्रचंड उच्छाद होत होता. आम्ही सांभाळून त्यांना चुकवत चुकवत सगळ्या जागा बघत होतो. मधूनच आम्हाला मागून गुणाची हाक ऐकू आली. आपल्या आजूबाजूला दहाबारा माकडांना तो काय काय खायला घालत होता आणि आम्हाला त्या माकडांना नमस्कार करायला बोलवत होता. त्यांच्यापैकी कोणाचे चाळे जास्त आचरट होते हे काही कळायला मार्ग नव्हता. " हनुमानाचा अवतार आहे.....आशीर्वाद घ्या" गुणाने आग्रह केला.कलियुगातील हे हनुमानाचे सवंगडी इतके आक्रमक होते, की आज जर रावणाने सीतेला पळवलं असतं, तर रामाने नुसती ही माकडं दाखवल्यावर रावणाने आपणहून सीतेला रामाकडे सोपवून स्वतः प्रायश्चित्त करायला हिमालयात निघून गेला असता. आजूबाजूच्या एकाही मनुष्यप्राण्याला हि माकडं सुखाने काही करू देत नव्हती. गुणाला त्याच्या त्या मर्कटलीलांमधून आणि त्याच्या आजूबाजूच्या त्या मर्कटांमधून बाजूला करत आम्ही त्याला पोटपूजेबद्दल विचारलं.

 एका छोट्याशा खानावळीत तो आम्हाला घेऊन गेला. अर्थात ती जागा तामिळ लोकांची तामिळ लोकांनी तामिळ लोकांसाठी उघडलेली असल्यामुळे तिथे इडल्या, डोसे आणि बाकी तामिळ पद्धतीचे सगळे पदार्थ होते. शाकाहारी या शब्दाचा अर्थ गुणासाठी 'तामिळ शाकाहारी' असा होता. कसेबसे ते तामिळ पदार्थ पोटात ढकलून आम्ही तिथून निघालो. तिथेसुद्धा मनासारखी कॉफी न मिळाल्यामुळे गुणाने त्या हॉटेलच्या मालकाला " एखाद्या दिवशी पोलीस येणार इथे या फिल्टर कॉफीमुळे मेलेल्याचा पंचनामा करायला" असा खास 'गुणा' स्टाईलचा टोला हाणला. गाडीत बसताना " परत इथे कोणाला नाही आणणार.....गुणाची इज्जत धोक्यात येईल नाहीतर....." असा त्याचा शेरा ऐकून मी खळखळून हसलो.

जवळचं एक तामिळ मंदिर त्याने आम्हाला दाखवलं. तिथे आम्ही नमस्कार केल्यावर आणि गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा घातल्यावर गुणाच्या मनात आमचा आदर शंभर पटीने वाढला. आम्हाला अचानक त्याने 'सज्जन', ' संस्कारी' वगैरे विशेषण द्यायला सुरुवात केली. आता गुणा खुशीत येऊन आमच्याबरोबर मस्त गप्पा मारायला लागला. त्याच्या त्या तामिळ वळणाच्या तोडक्या मोडक्या हिंदीची आम्हाला मजा वाटत होती. त्याची खास विशेषणं आणि तिरकस टोमणे ऐकून आमचं मस्त मनोरंजन होत होतं.

" मलेशियामध्ये स्थानिक मलय, चिनी आणि तामिळ भारतीय असे तीन शक्तिशाली समाज. फेंगड्या नाकाचे ( मलाया लोकांबद्दल गुणाचं खास संबोधन ) नुसते तोंडाची वाफ दाखवण्यापुरते, छोट्या डोळ्याचे (अर्थात चिनी लोक ) पक्के आतल्या गाठीचे......डोळे छोटे, नाक छोटं पण अंगातले किडे मोठे...... पण त्यांना पुरून उरतात तामिळ लोक. "

" आमची पूजा करायची पद्धत फेंगड्यांना आणि चपटयाना कळत नाही.....कवटीत मेंदूऐवजी नूडल्सची गुंडाळी असते ना....."

" यांच्या अंगात रक्त नाही, सोया सॉस असतं वाटतं.....ज्यात त्यात सोया सॉस....आणि भातात पण व्हिनेगर टाकतात बावळट लोक..... "

" काड्यांनी जेवण जेवतात.....idiot ! आपण एक घास दोन सेकंदात खाऊ, हे काड्यांनी उचलून उचलून तोच घास खायला दोन तास लावतात....."

गुणासाठी शक्य असतं तर त्याने मलेशियात तामिळ लोकांशिवाय कोणालाच राहू दिलं नसतं. इतरांच्या, अगदी भारतीय असूनही आमच्या सवयी किंवा कृती 'केवळ त्या तामिळ पद्धतीसारख्या नाहीत' म्हणून कशा चुकीच्या आहेत हे तो आम्हाला पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होता. भाताच्या ढिगाच्या मधोमध खड्डा करून त्यात सांबार ओतून तो कसा नीट कालवायचा इथपासून गव्हाच्या रोटीपेक्षा डोसा कसा आरोग्यदायी इतक्या टोकाचा त्याचा तो 'तामिळाभिमान' मला अचंबित करून गेला. काही गोष्टी देश बदलला, पिढ्या बदलल्या तरी तसूभर जागच्या हालत नाहीत, याचा ते ढळढळीत उदाहरण होतं.

दुसऱ्या दिवशी आम्हाला हा गुणा एका छानशा प्राणिसंग्रहालयात घेऊन गेला. तिथे वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती आम्ही घेत असताना याच्या खास शेऱ्यांनी आमची चांगलीच करमणूक होत होती. तिथल्या एका माणसाने आम्हाला हातात एक अजगाराचं पिल्लू दिलं. आम्ही घाबरत घाबरत त्याला हातात घेतला तोच हा कुठूनसा अवतरला आणि ते पिल्लू त्याने स्वतःच्या गळ्यात घालून दाखवलं. पिवळ्या सोनसाखळीबरोबर हा पिवळा अजगर त्याच्या गळ्यात त्याच्या अव्वल वर्णावर उठून दिसत होता. कदाचित त्या अजगराला गुणाच्या केसांना थापलेल्या तेलाचा उग्र वास सहन झाला नसावा, कारण तो सारखा सरपटत खाली उतरायचा प्रयत्न करत होता आणि हा त्याला परत उचलून गळ्यात घालत होता. पुढे पोपटांना खायला घालताना पुढे पुढे करून त्याने अंगावर इतके रंगीबेरंगी पोपट बसवून घेतले, की त्याला बघून रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या झाडाची आठवण झाली. प्रत्येक ठिकाणी माझी लहान मुलगी आणि गुणा एकाच उत्साहाने बागडत होते. कदाचित साठीनंतर त्याचं दुसरं लहानपण सुरु झालं होतं.

त्या दिवशी जेवायला तो आम्हाला जिथे घेऊन गेला, तिथे बसायला बैठक होती. याने मांडी घालून बसायचा प्रयत्न करताच त्याच्या अगडबंब पोटाचा विस्तार सहन न होऊन शर्टाची पोटावरची दोन बटणं उडाली. शर्टाच्या त्या जागेतून मग त्याचं ते भलं मोठं पोट, त्यातली विहिरीसारखी बेंबी आणि मधूनच डोकावणारं जानवं असा सुरेख देखावा आम्हाला दिसायला लागला. त्या सगळ्याचा ढिम्म परिणाम त्याच्यावर झाला नव्हता. तशाच अवस्थेत तो जेवला आणि त्या बटणांच्या जागी त्याने चक्क 'टूथपिक' खोचून बटणांची सोय केली.

त्या तीन दिवसात गुणामुळे आम्ही भरपूर फिरलो. अनेक जागा त्याने आम्हाला स्वतःहून वाट वाकडी करून दाखवल्या. बोलता बोलता जेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाबद्दल सांगितलं, तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याची खुद्द क्वालालंपूरमध्ये चार-पाच घरं होती. मुलगी डॉक्टर,मुलगा सिंगापूरमध्ये एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आणि दुसरी मुलगी डॉक्टरेट करत असल्याचं कळल्यावर हा माणूस हे काम नक्की का करतोय, याची मला उत्सुकता वाटली. मुद्दाम विषय काढून मी त्याला विचारला, आणि अचानक त्याचा चेहरा गंभीर झाला.

" एक सांगू, सगळं आहे.....पण बायको नाही. मी हेच काम करून मुलांना शिकवलं. माझी स्वतःची ट्रांसपोर्ट कंपनी होती. ती विकली, पैसे घरं घेण्यात गुंतवले.....पण आरामात जगणार असा वाटलं आणि बायको गेली. मुलं सांगतात, आमच्याबरोबर राहा. मी विचार केला, कशाला त्यांना त्रास.....त्यांच्या आणि माझ्या पिढीत खूप मोठं अंतर आहे.....मग पुन्हा मी हे काम सुरु केलं. मला दुसरं काय येतं ? आता वेळ जातो, दिवस जातो....रात्र त्रास देते. रोज घेरी गेलो की एक 'पेग' घेतो आणि झोपायचा प्रयत्न करतो.... "

त्याच्या आत दडलेला हळवा बाप, नवरा आणि कुटुंबवत्सल माणूस मी नकळत जागा केला होता. मी त्याला नमस्कार केल्यावर तो अचानक पाघळला. हळूच डोळे पुसत त्याने मला, बायकोला आणि मुलीला आशीर्वाद दिले. तोंडातून शब्द काही फुटले नाहीत, पण एक अश्रूचा थेम्ब तेव्हढा खाली पडलेला दिसला. खिशातून त्याने एक अंगाऱ्याची छोटी पुडी काढून दिली. ती घेऊन मी त्याचा निरोप घेतला. जाताना पुन्हा हात वर करून त्याने आशीर्वाद दिला आणि गाडीत बसून तो दिसेनासा झाला.

कोणत्याही देशात, कोणत्याही जातीत आणि कोणत्याही धर्मात आशीर्वाद तेव्हढा एकसारखाच असतो, नाही का?

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...