Skip to main content

नांदी

नमस्कार मित्रांनो, माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉग वर आपला सगळ्यांचा स्वागत. हा ब्लॉग सुरु करायच्या आधी सुद्धा मी खूप लिहिलंय, अजूनही लिहीत असतो, परंतु आपलं लिखाण कधी इतरांच्या समोर प्रस्तुत करायचा विचार अजून पर्यंत मनात आला नव्हता. आज या ब्लॉग च्या माध्यमातून तोच प्रयत्न करण्याचं धाडस करतोय, आशा आहे की हा ब्लॉग सगळ्यांना आवडेल आणि तो अधिकाधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने आपण योग्य त्या सूचना हक्काने कराल.

व्यवसायाने वास्तुविशारद असल्यामुळे आणि लहानपणापासून भटकंती करायची सवय असल्यामुळे मी आज पर्यंत जिथे जिथे फिरलो, ज्या ज्या व्यक्ती आणि वल्लींना भेटलो आणि जो जो अनुभव घेतला, त्याला शब्दांकित करण्याचा हा एक प्रयत्न. वाचन आणि माणसांचं व्यसन असल्यामुळे आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती करून घेऊन त्यातून नवे नवे अनुभव घ्यायची आवड असल्यामुळे आजवर गर्भश्रीमंत व्यक्तींपासून ते दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या अनेकांना मला भेटता आलंय , त्यांच्यातला माणूस समजून घ्यायचा प्रयत्न करता आलाय आणि काही वेळा अनपेक्षितपणे एखादी आयुष्यभर पुरेल अशी अनुभवाची शिदोरी मिळून गेलीय. जेव्हा जेव्हा या गोष्टी शब्दबद्ध करणं जमलं, तेव्हा तेव्हा त्या करून ठेवल्या असल्यामुळे मी ही स्मरणचित्रं सर्वांसमोर आणू शकतो आहे. यामागे अदृश्य आशीर्वाद आहेत ते  शाळेतल्या शिक्षकांचे , त्यांच्या अस्सल मराठी संस्कारांचे, घरातून सतत मिळालेल्या प्रोत्साहनाचे आणि मराठीतल्या अनेक सिद्धहस्त लेखकांच्या विविधांगी साहित्याच्या बाळकडूचे.

या ब्लॉग वर मला उमजलेलेल्या अनेक विषयांना हात घालण्याचा माझं प्रयत्न असेल. वैयक्तिक टीका, अश्लाघ्य भाषेतल्या प्रतिक्रिया किंवा ना पटलेल्या मतावर व्यक्त केलेली पूर्वग्रहदूषित मतं कोणाकडूनही येणार नाहीत अशी मी मनापासून आशा करतो आणि हा ब्लॉग अधिकाधिक वाचनीय व्हावा या दृष्टीने तुम्हा सगळ्यांकडून जास्तीत जास्त सहकार्य होईल अशी आशा बाळगतो.

आजवरच्या प्रवासात भेटलेले वेगवेगळ्या देशांचे, जातीचे, पंथांचे आणि स्वभावाचे शेकडो लोक आणि त्यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांमध्ये आलेले तऱ्हेतऱ्हेचे अनुभव शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. हे लोक मला किती वेळ भेटले, यापेक्षा त्या भेटीत ते काय देऊन गेले यावर त्यांच्या स्मृती माझ्या मनावर रेखाटल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्या कागदावर उतरवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यातला माणूस शोधायची धडपड लिखाणातून डोकावू शकते. मुळात विक्षिप्त, तऱ्हेवाईक किंवा विचित्र अशी विशेषणं लावलेले लोक मला नेहेमीच नाकासमोर बघून ठरवलेल्या वाटेवर चालणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आवडत असल्यामुळे आणि त्यांच्याकडून नेहेमीच काहीतरी जगावेगळे अनुभव ऐकायला मिळत असल्यामुळे काही वेळा मुद्दाम वाट वाकडी करूनही मी त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यातले गुणदोष, त्यांचा भलाबुरा स्वभाव किंवा त्यांच्यातली व्यंग यापलीकडे जाऊन त्यांच्या ' व्यक्तिमत्वाचा' शोध घेण्याच्या ध्येयामुळे अनेकदा विचित्र प्रसंगांना मला तोंड द्यावं लागलेलं आहे, पण अशा प्रत्येक प्रसंगानंतर मागे वळून बघितल्यावर माझं अनुभवविश्व अधिकाधिक समृद्ध झाल्याचा आनंद मला जास्त महत्वाचा वाटत आलेला आहे.

गर्दीतल्या या ' माणसांमुळे' मी अनुभवाने अतिशय श्रीमंत झालो, यात यत्किंचितही शंका नाही. किंबहुना अनेक वेळा आयुष्याकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन त्यांनी नकळतपणे मला दिला हेही खरं. त्यासाठी त्यांचा आजन्म ऋणी राहण्याच्या दृष्टीने त्यांना मी देऊ शकेन अशी छोटीशी भेट म्हणून मी माझा हा लेखनप्रपंच त्यांनाच अर्पण करणं इथे संयुक्तिक ठरेल. यात जे जे काही चांगलं वाटेल, त्याचं श्रेय त्या सगळ्या वल्लींचं आणि कुठे काही कमी पडलं असेल तर ते न्यून मात्र माझंच!


Comments

  1. नमस्कार
    मी हर्षद पेंडसे
    मायबोलीवर मिळालेल्या लिंक वरून इथे आलो आणि कामातूनही तुकड्या तुकड्यातून सगळा ब्लॉग वाचून काढला.
    अव्वल आणि अस्सल लिखाण आहे हे. मला हे सर्व लिखाण एकत्रित पुस्तक स्वरुपात वाचायला आवडेल.

    मला ह्याचे पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजेच. :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...