Skip to main content

' ताप ' गंधर्व

संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीत हा माझा जिव्हाळ्याचा विषय. आजच्या पंजाबी वळणाच्या आणि केवळ ठेक्यावर जोर देत गायला जाणाऱ्या गाण्यांचा मला प्रचंड तिटकारा आहेकिंबहुना ही गाणी ' तयार' करावी लागतात हे मला पटत नाही आणि म्हणूनच हे सगळं मला बरंचसं सपक वाटतं. कवितेचे शब्द, भाव, त्यात अभिप्रेत असलेला अर्थ याचा सखोल विचार करून सुरांना त्या शब्दांमध्ये अलगद गुंफायची कला प्रचंड तपस्या  करून मिळते, म्हणूनच असेल कदाचित, पण आजच्या ' फास्ट फूड' च्या जमान्यात फार कमी वेळा अशी गाणी ऐकायला मिळतात.

दुबईला महाराष्ट्र मंडळात अधून मधून शास्त्रीय संगीत आणि भावसंगीताचे कार्यक्रम होत असतात, जे माझ्यासारख्या ' जुन्या वळणाच्या' संगीतप्रेमींना पर्वणीसारखे वाटतात. इथे संजीव अभ्यंकर यांच्यापासून अगदी संदीप - सलील यांच्या अतिशय गोड गाण्यांचे कार्यक्रम मी अनेक वेळा पाहिले आहेत. अशा कार्यक्रमाला बहुतेक श्रोते मध्यम वयाचे असले, तरी त्या सगळयांमध्ये मी माझी खुर्ची आग्रहाने पटकावत असे. कानठळ्या बसवणाऱ्या पाश्चिमात्य रॉक शोपेक्षा मला हे साधे सुटसुटीत अभिजात संगीताचे कार्यक्रम जरा जास्त खुणावत असत. अशाच एका कार्यक्रमात माझ्या शेजारी येऊन बसला आणि पुढे ओळखीचा झालेला माझ्यासारखाच एक 'तिशीच्या आतला ' तरुण म्हणजे प्रसाद जोग.  खरं तर मी त्याच्याशी आपणहून बोलायला गेलोही नसतो, पण संजीवजींनी एक तान अतिशय डौलदारपणे समेवर आणून संपवली आणि अचानक माझ्या बाजूचा हा प्राणी ' ओहो...अहाहा...धैवत रे धैवत...व्वा...' असं काय काय एका दमात बोलून गेला आणि माझी त्याच्याकडे नजर वळली. मला त्याची ती दाद चमत्कारिक वाटली. हे प्रकरण नक्की काय आहे, हे काही मला समजलं नाही, पण मध्यंतराच्या वेळी चहा घेताना तो बाजूला आला आणि ' तुम्ही कुठले?' असा प्रश्न त्याने विचारल्यामुळे तिथून आमच्या ओळखीची सुरुवात झाली.

मी? मी मुंबईचा...खरं तर ठाण्याचा...आपण?” मी साधं सोपं उत्तर दिलं.

आम्ही संजीव अभ्यंकरांच्याच गावचे.....पुण्याचे समोरून एकदम ऐतिहासिक मराठीतून उत्तर आलं….तेही फुललेल्या छातीसकट.

त्या शिडशिडीत काटकुळ्या देहातून ' आम्ही' हे संबोधन मला जरा विचित्रच वाटलं. कोणास ठाऊक, कदाचित सहकुटुंब आला असावा आणि त्या अर्थाने ' आम्ही ' म्हणत असावा असं वाटून मी त्याला प्रतिप्रश्न केला.

 " आपले घरचे पण आलेत का आज? "

नाही, मी एकटाच आहे......विवाहाचा विचार तूर्तास नाही…

मी गार झालो.हे पुणेरी शुद्ध मराठी बरेच दिवसांनी कानावर पडत होतं.

" बरं ते जाऊदे...कसे वाटले आमचे संजीवजी? "

" आमचे? "  फक्त पुण्यात जन्म झाल्यामुळे  थेट संजीव अभ्यंकरांना 'आमचे ' म्हणणं म्हणजे साध्या शुभंकरोती म्हणण्याच्या पुण्याईवर थेट संतपदावर हक्क सांगण्यासारखं होतं. मी त्याला टाळायचा प्रयत्न केला, तर त्याने खांद्यावर हात टाकून मला संजीव अभ्यंकरांवर आणि त्यांच्या गायनावर मी विचारताच भरभरून माहिती द्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्यांना तो चुकून संजीवजींच्या घरचाच वाटून गेला असावा, कारण त्यांचे त्याच्याकडे बघण्याचे भाव एकदम आदरयुक्त वगैरे झाले. शेवटी एकदाचं मध्यंतर संपलं आणि आम्ही पुन्हा आपापल्या खुर्चीवर येऊन बसलो.

त्यापुढच्या सत्रात कार्यक्रम रंगला की नाही ते काही मला कळलंच नाही. हा सारखा ' अरे, संजीवजींनी कोमल निषाद काय लावलाय बघ' , ' ते बघ कसे तालाशी खेळत खेळत तान घेतायत' , ' अरे कोमल .......हि भैरवी आहे, मला आधी वाटलं भैरव गातायत संजीवजी' अशी अखंड कुजबूज करत होता. मला गाण्याच्या व्याकरणाची फारशी माहितीही नाही आणि आवडही नाही...गाण्याचा आस्वाद घ्यावा आणि मनसोक्त ऐकत राहावं यापलीकडे मला चिकित्सक होऊन गाण्याची चिरफाड करणं जमत नाही. शिवाय अशा रंगलेल्या कार्यक्रमाच्या वेळी भैरवी आणि भैरव यातला फरक समजून घेणं कोणाला आवडेल? पण हा टोळभैरव मला ' हा बघ तो कोमल .....म्हणून हि भैरवी कळलं का?' असं अगदी शाळामास्तर असल्यासारखा मला सांगत होता. त्या दिवशी केवळ या प्राण्यामुळे संजीवजींनी लवकरात लवकर गाणं संपवून माझी एकदाची सुटका करावी असं मला मनापासून वाटत होतं.

या माणसाचे मग मला फोन यायला लागले. अमुक अमुक जागी अमुक अमुक गायक येतोय, जाऊया का असं दर दोन आठवड्यांनी मला फोनवर विचारायला लागला आणि हा जाणार असेल तर त्या कार्यक्रमात लपत छपत जाऊन अंधाऱ्या कोपऱ्यातली खुर्ची तरी शोधायची किंवा त्या दिशेलाच फिरकायचंच नाही हे दोन अलिखित नियम मी कटाक्षाने पाळायला लागलो. शेवटी काही दिवसांनी त्याने एका कार्यक्रमाची तिकिटं स्वतः काढून मला बरोबर यायची गळ घातली आणि माझ्याकडे नाही म्हणायचा पर्याय ठेवून माझी पंचाईत केली. कार्यक्रम होता दक्षिण भारतीय गायकांच्या शास्त्रीय- उपशास्त्रीय संगीताचा. कार्यक्रम सुरु झाल्या झाल्या ' अरे वा.....आज सुरुवात मृदंगमच्या तडफदार सुरांनी होणार वाटतं.....तुला माहित्ये, ढोलक, ढोलकी आणि मृदंगम हे वेगवेगळे असतात बरं का.....' अशी त्याची ती कानात डास जसा सतत गुणगुणत राहतो तशी कुजबूज सुरु झाली.

ते आहेत ना......ते आहेत प्रख्यात व्हायोलिनवादक डॉक्टर सुब्रमण्यम.....ते आता जुगलबंदी सुरु करतील. त्यांच्या व्हायोलिनमधून दैवी सूर बाहेर पडतात......असं वाटावं जणू काही साक्षात कृष्णच !”

कृष्ण बासरीव्यतिरिक्त व्हायोलीनसुद्धा वाजवायचा हा नवा शोध मला लागला.

पुढेधा धिं कित्ता तूंनाअश्या अगम्य अक्षरांनी तो माझी त्या तालाशी ओळख करून द्यायला लागला. समोरच्या तबलजींच्या तबल्याची पितळी हातोडी मला त्याच्या टाळक्यात हाणावीशी वाटत होती. मग त्याचे ' गायकीच्या अंगाने जाणाऱ्या ' वादनावरचे बहुमोल विचार मला ऐकावे लागले. या सगळ्यानंतर का कुणास ठाऊक, पण समोरचे गायक बदलले, सूर लागले आणि अचानक हा माणूस शांत झाला. डोळे मिटून दोन-तीन मिनिटं तसाच राहिला आणि मी थोडासा सुखावलो. त्याची ही निद्रा 'चिरनिद्रेत' बदलावी, अशी 'प्रार्थना' करून मी कार्यक्रमात हळूहळू ' विरघळायला' लागलो आणि.... 

"
पुरिया धनश्रीएकदम कान पिरगाळल्यासारखा तो ओरडला.

"
हि कोण धनश्री?" मी गोंधळून विचारलं. " अरे, हा राग आहे.....मी झटकन ओळखला बघ....पहिला आरोह अवरोह कानावर पडल्यावर मी कोणत्याही रागाची ओळख पटवून देऊ शकतो...." त्याच्या या वाक्यांनी तो मूळपदावर आल्याचं मी ओळखलं.


त्या गायकाच्या प्रत्येक आरोहा-अवरोहाबरोबर आता प्रसाद रंगात यायला लागला. पुढचे दीड तास स्टेजवर चाललेल्या सगळ्या गोष्टींचं धावतं समालोचन आणि त्याने स्वतःचे मौलिक विचार घालून तिथल्या तिथे तयार केलेलं प्रत्येक हरकतींचं विवेचन त्याच्याकडून अनिच्छेने ऐकून घ्यावं लागलं. त्यात त्याची ती साजूक तुपात घोळवलेली शृंगारिक आणि ऐतिहासिक मराठी माझ्या त्रासात अजून भर घालत होतं.

"
रातराणीचा सडा पडल्यावर जसा सुगंध दरवळतो तशी ती डॉक्टर साहेबांची मींड वाटते."

"
व्यंकटेश्वरांनी मृदंगम असा वाजवला कि तो मागे बसलेला तबलजी त्या ठेक्यांच्या वावटळीत कुठल्या कुठे उडाला बघ" वास्तविक तो बिचारा तबलजी दोन तास तबले कुटून चार चहाचे घोट घेत लुंगी सांभाळत विंगेत उभा होता.

"
अरे, सम अगदी त्या 'धा' वर कशी अलगद अली बघ......तसूभर पुढेमागे नाही......डॉक्टर साहेब कसले प्रतिभावंत आहेत "  वास्तविक प्रसाद आणि डॉक्टर साहेब यांच्या सांगीतिक वकूबात शेंगदाणा आणि काजूइतका फरक…पण त्याला त्याची फिकीर नव्हती. आपण कोणीतरी खांसाहेब किंवा पंडितजी असल्याच्या थाटात तो थेट जागतिक कीर्तीच्या गायक-वादकांवर टिप्पण्या देत होता.

"
द्रुत तालात मृदंग आणि तितक्याच द्रुतवेगात व्हायोलिनचे सूर......आज कृतकृत्य झालो...आत्ता यमराज आले तर सांगेन घेऊन जा मला....."

यमराजांनी त्याचं म्हणणं मनावर घेतलं असतं तर त्यांनी प्रसादचे प्राण काढून घेईपर्यंत त्यांच्या रेड्याच्या पार्किंगचे पैसे मी स्वखुशीने भरले असते. एक मिनिट या महाभागाने मला त्या मैफिलीची मजा घेऊ दिली नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो तर त्याने माझा हात खेचून माझ्या कानात पुटपुटायला सुरुवात केली. शेवटी माझ्या माणुसकीचा बांध फुटून चहापानाच्या वेळेस मी त्याला सांगितलं,

" अरे तू मला सगळं काही सांग,पण कार्यक्रमानंतर. अशाने मला ना धड तुझं समजतं त्या स्टेजवरचं......" त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.

" मित्रा, अमूल्य ज्ञान मिळवतोयस तू......दुबईला इतक्या बारकाईने संगीताची माहिती समजावून देणारा कोणी मिळेल का? काही दिवसांनी तूच म्हणशील, माझे कान माझ्या या मित्रामुळेआता तयार झालेत.....आता या कानांना फक्त दर्जेदार, रसाळ आणि शास्त्रशुद्ध संगीतच कळतं...." त्याचं पुढचं एकपात्री स्वगत ऐकायची शक्ती माझ्या कानांमध्ये उरली नव्हती.

हा माणूस संगीतात विशारद झालेला होता हे मला कळल्यावर या सगळ्या गोष्टींचा उलगडा मला झाला. त्याचं स्वप्न होतं पुढे जाऊन ' भारतातल्या विविध सांगीतिक घराण्यांचा इतिहास आणि वर्तमान' या विषयावर डॉक्टरेट करायचं. पेशाने इंजिनिअर असलेला हा मनुष्य स्वतःला ' संगीतप्रेमी' ना म्हणवता 'संगीतोपासक' म्हणायचा. त्याच नावाने तो अगम्य कवितासदृश्य काहीबाही लिहायचा आणि त्या कवितांना ' आज काय रचना सुचली बघ....' असं म्हणत मला चाली लावून दाखवायचा... त्या प्रकाराला काव्य किंवा बंदिश म्हणणं म्हणजे पावसाळ्यात पाणी साठून तयार झालेल्या डबक्याला थेट मानसरोवर म्हणण्यासारखं होतं. मी त्याच्या कचाट्यात बेसावधपणे अलगद सापडायचो आणि मग तो त्याची ती ' बंदिशींची वही ' उघडायचा.

आता ऐक.... कालच सुचली मला ...

 
घोळका किती बाई....वारकऱ्यांचा!
विटेवरी उभा विठू पण...असे सर्वांचा....

हे काय आहे याचा मला काहीही थांगपत्ता लागत नव्हता. मी जरासा तडकलो.

"अरे, हे काय आहे ?? आणि काय ते ओढून ताणून कसंतरी 'एकदाचं जुळवलेलं ' यमक .......नाही येत तर का अट्टाहास? “

मित्रा, चाल ऐक.....' रावसाहेब निश्चल!

 घोssssss “ पहिल्या ' घो' वरच साहेबांनी आकार लावला. त्यानंतर धबधब्यात मस्ती करताना शेवाळावरून पाय घसरून थेट आठ-दहा फुटांवरून खाली पडावं तसा  'ळका' वर त्याचा सूर आला. मग बाई या शब्दावर पुन्हा एक तान. ते सगळं ऐकून बाजूला बसलेली हाडामांसाची बाई दचकली. शेवटी मीच त्याला कसंबसं शांत केलं.

" तुला असं नाही का रे वाटत की तू या सगळ्या फंदात ना पडता सरळ आलापी, नोम-तोम अशा स्वरूपाची   ' बंदिश ' रचावीस......शब्द नाही रे तुला जमत "

"
अरे, जमेल मला.....यतिभंग होतोय ना 'घोळका' शब्दात ? वाटलंच मला......"

"
अरे सगळी रचनाच  यतिभंगात गटांगळ्या खातेय रे.....यतिभंग कसला ' मतिभंग ' आहे हा "

 प्रसाद तरीही पुढे गातच राहिला.


पुढचे तास मग " साssसाssरेssरेssधाssss' कसं वाटेल, त्यापेक्षा ' रे नंतर मी थेट ' ' वर जाऊ का , काय बहार येईल...." असं असह्य आणि मेंदूला प्रचंड त्रास देणारं काहीबाही हा बोलत होता आणि मी समोर बसून ऐकत होतो. शेवटी रात्र होऊन जेवायची वेळ झाली, तेव्हा पूर्ण झालेली ती भिकार ' चीज ' घेऊन तो उठला. जाताना सुद्धा "आपण असेच संगीतावर बोलत राहिलो पाहिजे रे......आपल्या देशाची जाज्वल्य परंपरा आपण पालखीचे भोई होऊन पुढे नेली पाहिजे......आपला या थोर सांगीतिक इतिहासात छोटासा खारीचा वाटा म्हणून काहीतरी आपण या परंपरेला अर्पण केलं पाहिजे "असं काय काय तो बोलला आणि एकदाचा ( ! ) गेला. घरी आल्यावर डोकेदुखीची गोळी घेऊन झोपलो आणि त्या रात्री - वेळा तरी त्याच्या त्या गायनाचं स्वप्न पडून घाबरून जागा झालो.

हे ' ताप' गंधर्व आपल्या त्या सांगीतिक दुनियेत अडखळतच राहिले. ' होतकरू गायक-वादक' हेरून एकदा विनामूल्य संगीताचा 'क्लास' चालवायचा प्रयत्नही त्यांनी केला. त्या निमित्ताने त्याचं घर मला पहाता आलं आणि भिंतीभिंतींवर लटकलेल्या पंडितजींच्या आणि उस्तादांच्या तसबिरी बघून मी सर्द झालो. त्या सगळ्यांनी त्या घरात काय काय म्हणून सोसलं असेल, याची कल्पना येऊन माझ्या अंगावर काटा आला. खुद्द पंडित भीमसेनजींच्या मोठ्या फोटोखाली त्याने एक जाजम अंथरून आपली रियाझ करायची बैठक थाटली होती. चुकता तो तिथे बसल्यावर सगळ्यांना नमस्कार करायचा, दोन उदबत्त्या लावायचा, तंबोऱ्याला हळद-कुंकू लावायचा आणि डोळे मिटून ' रियाझ' करायचा. त्या उदबत्या तेव्हा 'मृत' व्यक्तींच्या डोक्याशी लावलेल्या असल्यासारख्या केविलवाण्या वाटायच्या. त्याचबरोबर त्याच्याकडे तबले, ढोलकी, ५०-६० वर्ष जुनी पेटी, तितकीच जुनी दिमडी असं काय काय होतं. ती पेटी म्हणे त्याच्या आजोबांना खुद्द कुमार गंधर्वांनी दिलेली होती. त्यावरून त्याचे आजोबा एक तर त्याच्यासारखे मुळीच गात नसावेत किंवा त्याच्यासारखेच भयंकर गात असावेत आणि म्हणूनच कंटाळून ' ही पेटी उचल आणि जा इथून कायमचा' म्हणून गंधर्वांनी त्यांना बाहेर पिटाळून लावलं असावं याची खूणगाठ मी मनात बांधली.

त्या ' संगीतोत्तेजक मंडळाचं ' व्हायचं तेच झालं. एक एक करत मुलांनी तिथून काढता पाय घेतला आणि ' आजकालच्या मुलांना पॉप गाणी लागतात......कसदार संगीत नाही पचत त्यांना' अशी कारणं देत त्याने मला ' यापुढे गाणं शिकवेन तर त्यालाच, जो भीमसेनांनी आपल्या गुरूकडे वर्षभर केलेली तपश्चर्या करून स्वतःला त्या परंपरेचा पाईक होण्याच्या योग्यतेचा सिद्ध करेल' अशी आपली प्रतिज्ञासुद्धा ऐकवली. सवाई गंधर्व-भीमसेनजी यांची नाव बिनदिक्कत एका दमात घेणाऱ्या या महाभागाला मनातल्या मनात शिरसाष्टांग नमस्कार घालून मी पुढ्यात त्याने ठेवलेला चहा उचललाकेवळ नाव घेताना कानाला हात लावला म्हणून या महान गायकांच्या प्रती आदर व्यक्त होत नाही, हे मला त्याला तोच कान पिरगाळून सांगावंसं सारखं वाटत होतं.

काही दिवसांनी मला त्याने घरी बोलावलं, तेव्हा त्याचे आई-वडील खास पुण्याहून आले होते. आपल्या या एकुलत्या एक बाळासाठी त्यांनी बाकरवडी, आंबावडी असं काहीही आणता चक्क एक ग्रामोफोन आणि १०-१५ रेकॉर्डस् आणल्या होत्या. त्याच्या बाबांना रेकॉर्ड वर जुन्या उस्तादांची गायकी ऐकायला आवडतात हे समजल्यावर मी मनात देवाचा धावा सुरु केला....कोण जाणो, बापलेक एकसारखे असले तर जीवावर बेतेल अशी भीती मनात डोकावून गेली. बाबांनी उस्ताद बडे गुलाम अलींची एक रेकॉर्ड लावली आणि स्वतःच्या कुलदीपकाला गप्प बसायची खूण करून डोळे मिटले. दोन मिनिटांनी मला अतिशय मंजुळ आणि गोड आवाजात त्या रेकॉर्डिंगच्या सुरात विरघळणारा एक वेगळा सूर ऐकू यायला लागला आणि चमकून मी त्या सुराचा उगम शोधायला आजूबाजूला बघितलं.....

आई आत गात होती.

पुढे २०-२५ मिनिटं मला अक्षरशः त्या सुरांनी वेड लावलं. या पुस्तकी किड्याची आई इतकी तयारीची गायिका आहे आणि तिच्या सुरात इतका दैवी 'असर' आहे, हे मला विलक्षण वाटतं होतं. नंतर गप्पांच्या ओघात कळलं, कि आईंनी दस्तुरखुद्द डॉक्टर प्रभा अत्रेंकडे गायनाचे धडे घेतलेले होते. पुण्यात अनेक वर्ष गायनाचे धडे स्वतः दिले होते आणि ते सगळं एका पैचीही अपेक्षा बाळगता निस्पृह मनाने केलं होतं. या महाभागाने आईकडून सुरांचं व्याकरण घेतलं, घराण्याची माहिती घेतली, पुस्तकात लिहिलेलं एक एक पान आत्मसात केलं पण गाणं काही याला जमलं नाही.

त्याच्या आईने मग बोलता बोलता आपला मन मोकळं करायला सुरुवात केली. " मी सांगते रे माझ्या राजाला, तुला माझ्यासारखा व्हायची गरज नाहीये. तू स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस आणि तुझं आवाका सुद्धा वेगळा आहे. आईने केलं ते मी करणारच, पुढे नेणारच असं अट्टाहास करून नाही चालत....तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते कार्य पुढे न्या...मी त्याला सांगितलं, कि तू पेटी उत्तम वाजवतोस....तुला तालाची माहिती आहे.....गायन तुझ्यासाठी कदाचित नाही योग्य...तू नको बैठकीचा गायक व्हायच्या मागे जाऊस...." त्याच्या त्या तश्या वागण्याच्या मागचं कारण मला आता व्यवस्थित समजलं होतं. आई आणि बाबांनी त्याची खूप समजूत घातली होती आणि तरीही तो वस्तुस्थिती मान्य करता मृगजळामागे धावायचा अट्टाहास करत आपली सोन्यासारखी वर्ष वाया घालवत होता.

पुढची दोन वर्ष तो असाच चाचपडत राहायला. अनेकांनी त्याला समजावायचा प्रयत्न केला पण त्याच्या मानगुटीवर बसलेलं ते 'ध्येयाचं' भूत काही उतरायला तयार नव्हतं. एके दिवशी आपण यूएई मधून परत आपल्या घरी पुण्याला जाणार आहोत असं त्याने कळवलं आणि दुबई सोडलं.

जवळ जवळ सात-आठ वर्षांनी मला ठाण्यालाच अचानक तो समोरून येताना दिसला. बरोबर त्याची बायको आणि -  वर्षाची गोड मुलगी होती. नमस्कार चमत्कार झाल्यावर मी त्याची विचारपूस केली, तेव्हा त्याने बायकोची ओळख करून देताना अभिमानाने म्हणाला, "ही माझी बायको स्टेजवर कार्यक्रम सादर करते बरं का.....फक्त शास्त्रीय गायकीचेच.....किराणा घराण्याची तालीम घेतलीय तिने १० वर्ष.....आणि माझी मुलगी म्हणजे बहुतेक माझी आईच परत जन्माला आलीय असं वाटतं रे......आत्तापासून काय गाते....."

"
आणि तू?"

"
मी त्यांना साथ देतो पेटीची."

त्याच्यातला तो बदल सुखावणारा होता. मी त्याला " हा बदल कशामुळे?" असं विचारल्यावर दोन मिनिट तो शांत झाला आणि मुलीकडे बोट दाखवत म्हणाला, "आई गेली आणि परत आली......ती होती तोवर तिचं म्हणणं हट्टाने टाळत राहिलो......आता ती परत आल्यावर तिला पुन्हा तेच सगळं बघायला कसं वाटेल?"  मी त्याला मनापासून मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं आणि पुण्याला काय करतोस आता म्हणून विचारलं.

कदाचित ते विचारायची गरज नव्हती. ते कुटुंब त्यांच्या ' संगीतोत्तेजक मंडळाच्या' विधायक कामात पूर्णपणे समर्पित होऊन संगीताच्या प्रसारात त्यांचा 'खारीचा वाटा' उचलत होतं.

Comments

  1. Mala ek vyakti mahot aahe ashi.
    Ha Mandar Karanjkar ka ho?

    ReplyDelete
    Replies
    1. sorry, naav asa jahirpane nahi sangta yenaar...manapasoon maafi magto. vyaktirekha jyanchya ahet, tyanna majhya likhanamule kasla traas hou naye hich iccha ya nakaramage ahe.

      Delete
    2. samaju shakto...taripan ha mandarach wattoy

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...