Skip to main content

आफ्रिकेचा प्राणीमित्र

एकदा दुबईच्या एका क्लायंटने आमच्या ऑफिसला एका खास कामासाठी पाचारण केलं. एका भल्या मोठ्या 'पार्क' मध्ये त्याला ५०-६० मोर असलेलं एक उद्यान बनवायचा होतं आणि त्यासाठी आम्ही त्याला वेगवेगळे आराखडे बनवून द्यावे अशी त्याची इच्छा होती. अर्थात वास्तुविशारद व्यक्तींना मोर या पक्ष्याबद्दल   सखोल माहिती असणं शक्यच नव्हतं; म्हणून आम्ही एका तज्ज्ञ व्यक्तीला आमच्याबरोबर त्या कामात सहाय्यक म्हणून नेमलं. स्वतः प्राणिशास्त्रात डॉक्टरेट केलेली आणि काही प्राणिसंग्रहालयाच्या आराखड्यात तज्ज्ञ म्हणून काम केलेली डॉक्टर एलिस आमच्याबरोबर कामात सहभागी झाली आणि तिच्याबरोबर तिचा सहाय्यक म्हणून आलेला ओबादा नावाचा एक मध्यमवयीन आफ्रिकी तरुण आमच्या परिचयाचा झाला.

अतिशय अबोल, लाजाळू आणि शांत स्वभावाचा हा माणूस गर्दीत सहज हरवेल असा असूनही एका विशिष्ट प्रसंगामुळे मला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. क्लायंट मीटिंग मध्ये मोर या पक्ष्याच्या एकंदर स्वभावाचा, त्यांच्या नव्या वातावरणाची सवय व्हायच्या सगळ्या प्रक्रियेचा आणि नव्या जागी त्यांना आणल्यावरच्या पुढच्या ८-१० महिन्यात आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचं त्याने इतका सखोल विवेचन इतक्या नेमक्या शब्दात मांडलं, की त्या १ तासात तिथले सगळे जण शब्दशः भारावले. अर्थात क्लायंटकडून वाहवाही मिळून आमच्या त्या कामाचा भरभरून कौतुक झालं आणि सगळ्यांनी या ओबादाला डोक्यावर घेतलं,  पण इतका सगळं होऊनही स्थितप्रज्ञ राहून तो मात्र तेवढ्यापुरतं हसून सर्वांना ' thank you ' इतकंच म्हणत होता. हा माणूस काहीतरी वेगळा आहे, याची खात्री मला तिथेच पटून गेली.

कामानिमित्त मी त्याला भेटत राहिलो, त्याच्याबरोबर बोलत राहिलो पण त्याने कामाव्यतिरिक्त एक अवाक्षरसुद्धा कधी काढलं नाही. त्याच्या मनात नक्की कसली अढी आहे, हे मला कळत नव्हतं आणि मी कामाव्यतिरिक्त काहीही बोलायला लागला की तो गाडी पुन्हा रुळावर आणत होता. थेट प्रश्न विचारूनही मंद स्मितहास्य यापुढे काही हाती लागत नव्हता आणि मला त्याच्याविषयी वाटणारी उत्कंठा त्यामुळे अधिकाधिक वाढत होती.

एके दिवशी त्यांच्या 'ऍनिमल फार्म' - अनेक देशातून वेगवेगळ्या कारणासाठी आणलेले प्राणी-पक्षी जिथे सुरक्षित ठेवून त्यांना वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत केली जाते ती जागा - मध्ये आम्ही सगळे मोरांच्या वेगवेगळ्या सवयीची माहिती करून घ्यायला गेलो आणि तिथे घडलेल्या एका प्रसंगानंतर याचं ते मौनव्रत एकदाचं सुटलं. मोर, लांडोर, त्यांची पिल्लं आणि अंडी अश्या सगळ्या गोष्टींनी भरलेली एक मोकळी कुंपण घातलेली जागा आम्ही बघत होतो. तिथे मोरांना लागणाऱ्या नैसर्गिक निवाऱ्याची , अंडी घालण्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट वातावरणाची आणि व्यवस्थित जगता यावा म्हणून लागणाऱ्या जागेची आम्ही माहिती घेत होतो. तितक्यात दोन मोरांची आमच्यासमोरच जुंपली आणि त्यांच्यात त्या सुंदर दिसणार्या पक्ष्याबद्दल भीती वाटेल असं युद्ध सुरु झालं. महत्प्रयासाने तिथल्या लोकांनी ते थांबवलं आणि त्या मोरांना कुंपण घालून तयार केलेल्या छोट्या पिंजऱ्यात ढकललं. ओबादा त्या सगळ्या ओरडून ओरडून ज्या सूचना करत होता त्या बघून या माणसाला त्या पक्ष्यांची नस अचूक समजलेली आहे याची खात्री आम्हाला पटत होती.

त्या सगळ्या प्रकारानंतर आम्ही शेवटी घाम पुसत तिथल्या छोट्याशा ऑफिसमध्ये आलो. पाणी,  चहा-कॉफी वगैरे सोपस्कार झाल्यावर समोर असणाऱ्या कोणाचीही पर्वा ना करता ओबादा म्हणाला, ' मुळात मोरासारख्या पक्ष्याला पाळणं सोपं  नाहीये हे तुम्हाला कळलं असेलच...मी याआधी अनेकदा बोललोय, की मोर आपल्याला लागणाऱ्या जागेची सीमा आखून घेतो आणि त्यात तो कोणालाही येऊ देत नाही. अन्यथा आत्ता झाली तशी झटापट होऊ शकते. त्यामुळे यापुढे जितके मोर तुम्हाला ठेवायचे आहेत, तितक्या प्रमाणातली जी जागा मी सांगेन, ती न कुरबुरता मान्य करा, अन्यथा पुढे जाऊन हे 'असं' दररोज तुम्हाला निस्तरायला लागेल! '

बैठकीचा नूर पालटला. शांत वाटलेल्या ओबादाने आपल्या मनातली मळमळ बोलून सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. २ महिने सुरु असलेला ' मोरांच्या बागेसाठी नक्की किती जागा द्यायची?' हा वाद एका मिनिटात त्याने संपवला. नमस्कार चमत्कार झाल्यावर सगळे आपापल्या गाड्यांकडे गेले आणि मी तो मोका साधत त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत तिथेच थांबलो.

' मला माहित आहे, तुला मी इतका कमी का बोलतो हे समजत नाहीये, पण काय करू? पुस्तकातला ज्ञान घेऊन आलेले हे मोठे लोक मला मूर्ख समजत होते...पण त्यांना आता कळलं असेल, पुस्तकं वेगळी आणि खऱ्या दुनियेचा अनुभव वेगळा. यांना वाटतं, पैसा आहे म्हणून निसर्गाला सुद्धा विकत घेतील...अरे, निसर्ग विकत घेणं माणसाच्या आवाक्यात नाहीये...सांगा कोणीतरी यांना...'

ओबादाच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द खरा होता. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन अनेक गोष्टी यूएई मध्ये होतात, हे खरं आहे आणि त्याचे परिणाम काय होतील, हे आज जरी समजत नसलं तरी कधी ना कधी ते समजेलच, असा माझं आणि माझ्यासारख्या अनेकांचा मत होतं आणि आहे. त्याला शांत करत करत मी त्याला पुन्हा बैठकीच्या ठिकाणी नेलं आणि आमच्यात २-३ तास भरभरून संवाद झाला.

हा माणूस आफ्रिकेच्या केनिया देशातला. वडील वनरक्षक. जंगलात हत्ती आणि गेंड्यांची अवैध शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांच्या विरोधात याचे वडील अतिशय आक्रमक होत. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दोन-एक डझन शिकारी टोळ्या देशोधडीला लावल्या होत्या आणि त्याचं बक्षीस म्हणून पोलिसात काम करणाऱ्या पण आतून त्या टोळ्यांशी संधान असलेल्या एका झारीतल्या शुक्राचार्याने त्यांना तस्करीच्या खोट्या आरोपात अडकवून तुरुंगात टाकलं होतं . तिथे शरीर आणि त्याहूनही जास्त मन पार कोमेजलं आणि त्याचे वडील सरळ आपल्या गावात जाऊन दुकान टाकून उदरनिर्वाह करायला लागले. पण एका प्राणी-पक्ष्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या घरचं बाळकडू मिळाल्यामुळे ओबादा शेवटी पशुतज्ज्ञ होऊन वडिलांची गाडी पुढे चालवायला लागला.

' मी माझ्या या हाताने ५-६ शिकारी कायमचे अपंग केलेयत....मारलं असतं तर जेलमध्ये गेलो असतो. सोडलं असतं तर शरमेने मेलो असतो...मग मधला रस्ता धरला. सापडले कि त्यांची बोटंच तोडायचो मी...पुन्हा बंदूक हातात घेऊन गोळी नाही चालवू शकणार म्हणून!' हा माणूस इतका आक्रमक होऊ शकतो यावर माझा विश्वास बसायला थोडा वेळ गेला!

' शेवटी मला एकदा डॉक्टर एलिस भेटल्या. त्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत, पण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथे १५-२० वर्ष राहिल्यायत. त्या यूएई मधल्या श्रीमंत लोकांना वेगवेगळ्या देशाचे प्राणी आणि पक्षी आणून या नवीन वातावरणात स्थिरस्थावर करून देतात. त्यांचा तो व्यवसाय आहे. मी त्यांचा ' right  hand ' आहे. कोणताही प्राणी किंवा पक्षी मला सहज हाताळता येतो. त्यांच्यातच वाढलोय ना...I am a black Tarzen ' हसत हसत तो म्हणाला. वर्णावरून शेरेबाजी केलेली मला आवडत नाही, पण हा स्वतः त्या बाबतीत बेफिकीर दिसला.

त्यानंतर आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो, तेव्हा तेव्हा त्याच्याकडून प्राणी-पक्षी या एका विषयावर अनेक गमतीजमती ऐकायला मिळाल्या. त्याने आफ्रिकेत LAKE TANGANIKA , LAKE VICTORIA आणि NILE RIVER या जागी केवळ पाठीवरची बॅग घेऊन केलेली भ्रमंती, तिथे आलेले जगावेगळे अनुभव, चार-पाच इंच लांब विषारी किडे आणि त्से त्से नावाच्या माशीची तिकडे असलेली दहशत यावर मला २-३ तास त्याचे अनुभव सांगून मंत्रमुग्ध केलं. हत्ती आणि चित्ते हे त्याचे आवडते विषय.

' अरे, हत्ती किती प्रेमळ आणि सहृदयी प्राणी आहे माहित आहे का...स्वतःच्या पिल्लांना किती जपतात ते हत्ती. तू त्यांचं मित्र झालास ना, तर तू गेल्यावर रडतात ते हत्ती...तुला कोणी हात लावला तर त्याला सरळ उचलून फेकतील...आणि आपण माणसं! त्यांना का मारतो, तर त्यांचे हस्तिदंत हवे म्हणून...अरे कशाला हा नीचपणा? तुमचे दात उपटून विकू का बाहेर? आवडेल तुम्हाला?' एखाद्या कोर्टात जज समोर जसा युक्तिवाद करतात, तश्या पद्धतीने तो बोलायचा. शिकाऱ्याबद्दल सांगायचं असेल तर समोरचा श्रोता शिकारी आहे असं समजून बोलायचा आणि प्राण्याबद्दल सांगताना समोरच्याचा तो प्राणी करून टाकायचा.' आता बघ, तू चित्ता आहेस. किती जोरात धावतोस तू...किती सुंदर दिसतोस धावताना...पण या शिकाऱयांकडे बंदूक असते ना, त्यातली गोळी अजून जोरात येते...मग मरतोस तू...मला सांग, शिकारी बंदुकीशिवाय तुझ्यासमोर यायची हिम्मत करू शकेल काय ? हिम्मत असेल तर होऊन जाऊ दे ना मग...' माझ्या अंगावर ते ऐकताना ठिपकेदार शहारे आले!

आमच्या संभाषणात मी मग प्राण्यांपासून पक्षांपर्यंत काहीही होतं गेलो. एकदा बगळा पाण्यात एका पायावर कसा उभा राहतो आणि कशी शिकार करतो , ते मला त्याने तशाच पद्धतीने उभा राहायला लावून आणि वर समोरच्या टेबले वरचा बिस्कीट तोंडाने उचलायला लावून सांगितलं होतं. पायात सापळे लागल्यामुळे प्राण्यांना किती दुखत असेल, ते सांगताना माझं मनगट त्याने इतक्या जोराचे दाबलं की मी अक्ख्या ऑफिसला ऐकू जाईल इतक्या जोरात ओरडलो होतो. त्याच्या त्या फार्म वर पोपटांना त्याने स्वतःच्या ताटातल्या एका खणात जेवायला वाढलं होतं आणि ' ते पोपट आहेत...माणसं नाहीयेत...बघ, त्यांच्या जेवणाच्या व्यतिरिक्त माझ्या जेवणावर एकदा तरी त्यांनी चोच मारली का..' असा वर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिला होतं. औषध देऊन बेशुद्ध केलेल्या जिराफाच्या कानात कसला तरी संसर्ग झाल्याचा निदान करून त्याने स्वतःच्या हाताने त्यावर औषध लावलं होतं आणि तेही इतरांसारखं हातात ग्लोव्हस वगैरे काहीही न घालता. हा माणूस खऱ्या अर्थाने प्राण्या-पक्ष्यांच्या विश्वात जगत होता.

' आफ्रिकेत गरिबी आणि भष्टाचार किती आहे सांगू तुला...माझे बाबा त्यातच भरडले गेले. सगळे गोरे लोक आफ्रिकेला आपल्या बापाचा माल समजतात...वर्षानुवर्ष ओरबाडलंय आम्हाला त्यांनी. आम्ही लोक त्यांच्यासाठी प्राणीच आहोत...शरीराने मजबूत म्हणून आम्हाला त्यांनी प्राण्यांसारखाच वागवलं...लढाई करणारे सैनिक म्हणून , गुलाम म्हणून, नोकर म्हणून...आणि वर हे आमच्याकडे 'मदत' घेऊन येतात. आम्हालाच लुटता, आमचाच पैसा स्वतःला श्रीमंत करायला वापरता आणि मग उरलेलं आमच्या तोंडावर फेकून मदत केल्यासारखी दाखवता? हिरे, सोनं, खनिज, तेल...काय नाहीये आमच्याकडे...तुम्ही आम्हाला बरबाद केलाय रे बरबाद...' तो अगतिकतेने सांगत होता. मी तेव्हा त्याच्यासाठी एक ' गोरा पाश्चिमात्य सैतान' होतो , त्यामुळे भावनेच्या भरात हा मला खरोखर मारतोय कि काय अशी मला भीतीसुद्धा वाटून गेली.

प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर निरोपाच्या समारंभात आम्ही शेवटचे भेटलो. त्याला मी ' पुन्हा भेटूया....आणि भेटत राहूया...प्रोजेक्ट काय होतं राहतील' म्हंटलं आणि त्याने ते मंद हसू चेहऱ्यावर आणत ' मी आता पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला जाणार...डॉक्टर एलिस बरोबर तिथल्या प्राणिसंग्रहालयाच्या कामात त्यांना मदत करायला' अशी माहिती त्याने दिली. मोबाइलला त्याचा सक्त विरोध होता, कारण त्यांच्यामुळे पक्ष्यांना त्रास होतो हे त्याला पटत नव्हतं. आजच्या 'social media ' पासून तो लांबच होता, कारण त्याला आजूबाजूला गर्दीपेक्षा मोजकीच पण खरी माणसं जास्त आवडत होती. याच्याशी भेट कशी होणार, हा प्रश्न मला पडलेला होता, पण त्यानेच तो सोडवला.

' आजूबाजूला कोणतेही प्राणी, पक्षी किंवा बाकीचेही सजीव आनंदात आहेत ना, इतकं बघ मित्रा...आणि स्वतः त्यांना कधीही इजा करू नकोस. ते दिसले कि मीच आहे असा समज...पण मला मारावं असं नाही न वाटत तुला? घोटाळा होईल नाहीतर....' मिश्कीलपणे हसून त्याने विचारलं.

त्या क्षणाला फेसबुक, ट्विटर अश्या आभासी दुनियेत प्राणी वाचवा मोहीम चालवणाऱ्या जागतिक कीर्तीच्या कार्यकर्त्यांपेक्षा हा आफ्रिकेचा माझा मित्र मला त्या सजीवांचा खरा मित्र वाटला. 

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...