Skip to main content

शांतताप्रिय लढवय्या

जगाच्या पाठीवरच्या अनेक शापित देशांपैकी एक म्हणजे इराक हा अरबस्तानाच्या वायव्य टोकाला असलेला देश। तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांमुळे या प्रांतात सुमेरियन, असिरिअन, बाबीलोनिअन, मेसोपोटेमियन अश्या अनेक समृद्ध संस्कृती नांदल्या. एकेकाळचा हा समृद्ध आणि संपन्न देश आज पाश्चात्य देशांच्या हातातल खेळणं झालेला आहे आणि मागच्या १०० वर्षातल्या सततच्या लढाया, वांशिक नरसंहार, शेजारच्या देशाबरोबरचे तंटे अशा अनेक कारणांनी पार खिळखिळा होऊन गेलेला आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांनी १०० वर्षांपूर्वी पेरलेली दुहीची बीजं आज इतकी अक्राळविक्राळ फोफावली आहेत की त्यात अक्खा देश पोखरून निघालेला आहे. मुळात अरब, कुर्द, पर्शियन, येझदी, शबक, काकाई, रोमा, सिरकॅसियन आणि बदाऊनी अश्या अनेक जात-पंथाचे आणि त्यात पुन्हा शिया-सुन्नी या इस्लामच्या दोन शाखांमध्ये विभागले गेलेले लोक हा या देशाच्या विविधतेचा जरी नमुना असला, तरी या विविधतेत एकता मात्र नसल्यामुळे पाश्चात्यांनी या देशावर मनसोक्त डल्ला मारलेला आहे.

याच इराकच्या उत्तर भागात असलेल्या मोसूल शहरात जन्मलेला, वाढलेला आणि शिकलेला मोहम्मद समीर नावाचा आर्किटेक्ट माझ्या ऑफिसमध्ये माझ्याच बाजूच्या जागेवर कामानिमित्ताने रुजू झाला. सहा फुटाच्या आतबाहेरची उंची, भक्कम बांधा, खुरटे केस, पिंगट खुरटी दाढी, निळसर डोळे आणि गोल गरगरीत पोट अशा अवतारात मी त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला तो स्वभावाने चिडखोर, तापट आणि मितभाषी असावा असं वाटलं, पण तो माझ्या अंदाजाच्या अगदी विपरीत निघाला.  १-२ आठवडे लोकांशी ओळख होईपर्यंत जितक्यास तितका बोलणारा मोहम्मद नंतर नंतर खुलला आणि आमच्याबरोबर मस्ती मस्करी करायला लागला. हळू हळू त्या मस्तीच रूपांतर खोड्यांमध्ये झालं आणि त्याच्या दिलखुलास, लाघवी आणि दांडगट स्वभावाची झलक आम्हा सर्वांना दर दिवशी दिसायला लागली. कामात तो इतका चोख होता की कोणालाही तक्रारीला जागा मिळायची नाही। एकत्र काम करण्यासाठी तो एक आदर्श सहकारी होता. या आणि अशा अनेक कारणांमुळे आमची चांगली गट्टी जमली आणि आम्ही तासंतास गप्पांमध्ये रंगायला लागलो.

" मोहम्मद,अरे क्लायंटच्या ऑफिसमधून फोन होता, २ दिवसात त्यांना प्लॅन्स आणि 3D करून हवाय, मी प्लॅन्स करतोय, तू 3D सुरु कर...." आर्किटेक्टच्या ऑफिसमधला हा परवलीचा संवाद असतो. २ दिवसात, १ आठवड्यात, उद्या, आज रात्री अश्या पद्धतीची वेळ आम्हाला क्लायंट देतो आणि त्या वेळात सगळ्या गोष्टी सध्या करणं ही तारेवरची कसरत असते.  मग 'टीम' तयार होते, एकाला त्या प्रोजेक्टचा प्रमुख नेमलं जातं आणि पुढे दिवसरात्र कमला जुंपून घ्यावं लागतं. आजच्या स्पर्धायुगातली ही जीवघेणी कसरत नाखुशीने का होईना, पण करावीच लागते. त्यामुळेच बहुदा असेल, पण जर टीममध्ये हलकंफुलकं वातावरण ठेवू शकणारी आणि कामाच्या बाबतीत चोख असणारी डोकी असतील, तर त्या कामातसुद्धा रंगत येऊ शकते. हे सगळे गुण मोहम्मदमध्ये ठासून भरलेले होते आणि त्यामुळेच मी आणि तो आम्ही प्रत्येक काम एकत्रच करायला लागलो.

"अरे काय......एक दिवस गेला आणि तुला अजून चांगलं काही सुचत नाहीये का? क्लायंट खाऊन टाकेल.....आणि मग आपला डायरेक्टर आपली उत्तरपूजा बांधेल....." मी त्याला संध्याकाळी ५ वाजता त्याने दिवसभर राबून आजूबाजूला साठवलेला स्केचेसचा ढीग बघून मी तडकलो.

"अरे ए.........एका दिवसात तुला काय काय पाहिजे? सुचायला नको का ? २ मिनिटवाले मॅगी नूडल्स हवेत का तुला ?" मोहम्मदने परतफेड केली.

"अरे माझ्यासाठी करतोयस का रे? मला का ओरडतो? उद्या क्लायंट बोंबलला की जा त्याच्या समोर हा ढीग घेऊन.....तुझ्या पार्श्वभागावर त्याचा १२ नंबरचा बूट दिसेल मग"

"ऑफिसमध्ये तुझ्या तोंडातले दात तुझ्या टेबलवर पण दिसतील....एक एक करून मीच तोडेन ते....." मोहम्मदची धमकी.

" हिम्मत असेल तर 3D दाखव ना बनवून.... " मी त्याला अजून खिजवलं.

" आता बघ, उद्या सकाळी येशील तेव्हा जे दिसेल ना तुला, ते बघून तुझे प्लॅन्स तू फाडून फेकशील....challenge accepted " मोहम्मद जागेवरून उठला. एक कप भरून कॉफी ढोसली. २-३ सिगारेट संपवल्या आणि अचानक  " युरेका " म्हणून ओरडत हा आपल्या टेबलावर परतला. आमची सगळ्यांची वेळ झाल्यावर आम्ही निघालो , पण हा पट्ठ्या आपल्या कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसून काहीबाही करताच होता. उद्या सकाळी याचं म्हणणं खरं होऊ दे असा देवाचा धावा करत मी निघालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी टेबलवर मोहम्मदने रात्रभरात संपवलेलं ते 3D , त्याच्या बाजूला ' हे घे आणि घाल त्या क्लायंट च्या xxxx मध्ये ' अशी प्रेमळ सूचना लिहिलेला कागद, आपण आज थेट जेवणानंतर दुपारी येणार असल्याची सूचना लिहिलेला दुसरा कागद आणि त्याच्या बाजूला मी तयार केलेल्या प्लॅन्सच्या फोटोकॉपीवर ' हे भिकार काम आहे......यासाठी २ दिवस घेतलेस?' असा प्रेमळ खवचट टोमणा असा पसारा दिसला. त्याने रात्रभरात जे काही केलं होतं, ते खरोखर दृष्ट लागण्यासारखं सुरेख होतं. मी त्याला मुद्दाम अभिनंदन करायला फोन केला. त्याच्या बायकोने फोन उचलला आणि दुपारी १२ च्या आधी जगबुडी झाली तरी उठवू नकोस असा सांगून हा झोपलाय अशी मौलिक माहिती दिली. शेवटी दुपारच्या जेवणानंतर क्लायंटच्या ऑफिसमध्ये थेट सादरीकरण करायला साहेब आले आणि संध्याकाळी आम्ही दोघे ते प्रोजेक्ट आम्हाला मिळाल्याचं पत्रं  घेऊन ऑफिसमध्ये परतलो.

हा माणूस अतिशय मनस्वी होता. काम चांगलाच झालं पाहिजे हा त्याचा अट्टाहास कधी कधी अती व्हायचा, पण ठरलेल्या वेळेत उत्तम काम मिळण्याचं आमच्या ऑफिसमधलं हक्काचं टेबल फक्त त्याचंच होतं. त्याला कोणत्याही बंधनाशिवाय काम करायला आवडायचं. बरेचदा तो काम घरी घेऊन जायचा आणि त्यापायी बायकोच्या शिव्या खायचा. पण कसाही असला, तरी कामात चोख असल्यामुळे ऑफिससाठी तो एक 'asset ' झाला होता. भल्या भल्या लोकांना कात्रजचा घाट दाखवलेल्या आमच्या डायरेक्टरला याने असा धडा शिकवलं होतं कि त्याच्या वाकड्यात शिरायचं सहसा लोक टाळायचे. ' माझ्याशी चांगले वागाल तर डोक्यावर बसवेन, वाकड्यात जाल तर पायाखाली घेईन' अशी त्याची वागण्याची मोकळीढाकळी तऱ्हा होती.

एके दिवशी मोहम्मद स्वभावाच्या अगदी विरुद्ध एकटाच आमच्या ऑफिसच्या खाली सिगारेटवर सिगरेट संपवताना दिसला. एरव्ही बघितल्या बघितल्या येऊन गप्पा मारायला सुरु करणारा मोहम्मद आज गप्पा होता. तोंडदेखलं हसत त्याने मान वळवली आणि पुन्हा शून्यात बघत धूम्रवलयं काढत तो कसल्याशा विचारात पडला आणि ना राहवून मी त्याला पुन्हा एकदा टोकलं.

' मित्रा, काही झालंय का? नक्की कसला विचार करतोयस?'

' तुला काय सांगणार रे.....जाऊदे, सोड ना....'

' सांग ना, माझ्याकडून मदत होणं शक्य नसलं तरी सांग.....मदत होणार असेल तरच सांगायचं असा नियम आहे का?'

' अरे तुला सांगायचं म्हणजे मला इराकच्या इतिहासापासून सुरु करावा लागेल '

'  कर ना मग.....' मला त्यातला संदर्भ समजला नाही. तो तिरसटपणाने बोलतोय कि काय हेही काळात नव्हतं, पण त्याचा एकंदर स्वभाव पहाता ती शक्यता धूसर होती.

' अरे, मी कोण आहे माहित्ये का तुला? मी कुर्दिश आहे. आमच्या देशात अरब लोकांपाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्या असलेले आम्ही कुर्दिश लोक......इराकचा उत्तरेचा सुपीक भाग, डोंगररांगा, नद्या, नैसर्गिक साधनसंपत्ती आमच्या कुर्दिश प्रांतात येते. त्याचप्रमाणे आम्ही अमेरिकेचे जुने मित्र. काळ मला अशी एक बातमी मिळाली, कि एकदम ' आपण कुर्दिश म्हणून जन्म घेऊन गुन्हा केला कि काय' असा वाटून गेलं.'

' का? काय झालं?'

' इराकच्या संसदेत चर्चा सुरु आहे, आम्हा कुर्दिश लोकांचं ' इराकी ' नागरिकत्व रद्द करायची. पॅलेस्टिनी लोकांच्या समस्या केवळ सोयीस्कर भू-राजकीय कारणांमुळे सतत चर्चेत असतात, पण आम्हा कुर्द लोकांना आमचा देश, आमच्या हक्काच्या जागा आणि महत्व अजूनही मिळालं नाहीये हे कोणाला दिसतं का?'

मला काही क्षण काय बोलावं ते कळेना.कुर्दिश लोकांबद्दलमला तशी खूप त्रोटक माहिती होती, त्यामुळे मला या सगळ्यावर नक्की कशा पद्धतीने व्यक्त व्हावा ते समजेनासं झालं !

' मला माहित्ये, तुला सुद्धा माहित नसेलच हे. आम्ही कुर्दिश लोक कोण आहोत माहित्ये? पूर्वीच्या मेसोपोटेमियान साम्राज्यात उत्तरेकडच्या पर्वतात राहणारे ' करता ' टोळीचे लोक आमचे पूर्वज. काही लोक पूर्वीच्या पर्शियामधल्या 'मेदेस' लोकांना आमचे पूर्वज मानतात. काहीही असो, एके काळी आमचं 'कुर्दिश' साम्राज्य भूमध्य समुद्राच्या दोन्ही बाजूला इजिप्तपासून ते पार ट्युनिशियापर्यंत , इराकपासून खाली आत्ताच्या येमेनच्या पश्चिम टोकापर्यंत ऐसपैस पसरलेलं होतं. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्य रसातळाला गेल्यावर ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी आम्हाला वेगळ्या कुर्दिस्तानचं वचन दिलं.....अर्थात ते पाळायला दिलेला नव्हतंच ! कुर्दिस्तानमुळे आम्ही या भागात शक्तिशाली होऊ या एकमेव कारणामुळे त्यांनी आम्हाला इराक, इराण, सीरिया, लेबनॉन, तुर्कस्तान अशा देशांमध्ये तुकड्या-तुकड्यात विभागून टाकलं आणि प्रत्येक जागी आम्ही अल्पसंख्यानक होऊ अशी पुरेपूर काळजी घेतली.'

माझ्यासमोर झरझर इतिहासाची पण उलगडली जात होती. आपल्याकडे ब्रिटिशांनी जशी दुहीची बीजं पेरून खंडप्राय देशाची शकलं केली होती, तशीच अवस्था त्यांनी कुर्दिस्तानची सुद्धा केली होती. कुर्दिश लोकांनी अनेक वर्षं ऑट्टोमन , पर्शियन, अरब आणि त्या परिसरातल्या इतर टोळीवाल्यांशी सतत लढाया केल्या होत्या।आजसुद्धा इराणमध्ये त्यांना बरेच वेळा अतिशय वाईट पद्धतीने वागवलं जातं.

" अरे इराणमध्ये आम्ही लोक जातो येतो ना, तेव्हा आम्ही गुंड मवाली असल्यासारखं आम्हाला वागवलं जातं. तिथे काही रेस्टॉरंटमध्ये अजूनही आमच्याकडून छापील किमतीच्या २-३ पट जास्त पैसे घेतले जातात, का तर आम्ही कुर्द म्हणून ! "

माझ्यासाठी हे सगळं भयंकर होतं. जगात जिथे जिथे युरोपिअन साम्राज्यवादी देश गेले, तिथे तिथे त्यांनी निर्घृणपणे त्या त्या देशा-प्रदेशाचं अस्तित्व, संस्कृती, संपत्ती पद्धतशीरपणे रसातळाला नेली। त्या प्रदेशांमध्ये प्रचंड गुंतागुंत तयार करून ठेवली आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास भोगावा लागेल याची तजवीजही करून ठेवली. आम्हा दोघांचे देश वेगळे होते, पण इतिहास आणि वर्तमान बराचसा सारखाच होता.

पुढचे काही दिवस मोहम्मद अतिशय तणावाखाली होता. देशाबाहेर रहात असल्यामुळे 'पासपोर्ट' त्याच्या परदेशातल्या अस्तित्वासाठी अतिशय महत्वाचा होता आणि तोच मुळात वैध राहील की नाही, याचं त्याला प्रचंड दडपण आलं होतं. मुळात त्याच्या देशात ४-५ दशकं प्रचंड उलथापालथ झालेली होती. आधी सद्दाम हुसेन आणि त्याच्या लष्कराने कुर्दिश लोकांचं केलेलं शिरकाण , त्यानंतर अमेरिकेने इराकमध्ये केलेली ढवळाढवळ, त्यानंतरची यादवी आणि शेवटी त्या प्रदेशात अतिरेक्यांनी घातलेलं थैमान या सगळ्यामुळे परत आपल्या देशात जाणं किती अशक्यप्राय आहे, हे त्याला माहित होतं. माझ्यासारख्या भारतीय व्यक्तीला मातृभूमी, देश आणि कुटुंब आहे आणि कधीही परतीची वाट धारावी लागली तरीही आपण ' घरी' जाऊ शकतो हि माझ्यासाठी जमेची बाजू आहे, पण मोहम्मदसारख्याला मात्र ते अशक्य होतं. त्याचं घर आणि कुटुंब कधीच मातृभूमीबाहेर गेलं होतं. खुद्द वडील युक्रेनमध्ये आणि बाकीचे नातेवाईक युरोपमध्ये स्थलांतरित झाले होते। मोहम्मदसारखा दिलखुलास आणि मस्तीखोर माणूस या दिवसांमध्ये पार कोमेजला.

अखेर एक-दीड महिन्यानंतर कुर्दिश लोकांच्या नागरिकतेशी खेळ होणार नाहीत अशी चांगली बातमी आणि आणि मोहम्मदने अखेर मोकळा श्वास घेतला. त्या दिवशी तो इतका बोलत होतं, की बाकीचे सगळे जण अक्खा दिवस फक्त श्रोत्यांच्या भूमिकेत होते. त्याने स्वतः सगळ्यांसाठी मिठाई मागवली, कॉफी मागवली आणि संध्याकाळी बाकीचे लोक गेल्यावर मला तो जवळच्याच एका बागेत घेऊन गेला. नंतर ३-४ तास त्याने भरभरून मन मोकळं केलं. त्या संभाषणात मला कुर्दिश लोक, त्यांचा इतिहास, त्यांच्या चालीरीती, त्यांचं भारताविषयी असलेलं चांगलं मत अशा अनेक गोष्टींवर भरपूर माहिती मिळाली. आपल्याकडचे पंखे, गाड्या, पंप, बस अश्या अनेक गोष्टी वर्षानुवर्षे इराकी लोक वापरायचे आणि त्या वस्तूंचा दर्जा कोणत्याही युरोपिअन किंवा अमेरिकन वस्तूंच्या तोडीचा होता हे ऐकून मला आपल्या देशात आपल्या वस्तूंबद्दल असलेली अनास्था अधिक प्रकर्षाने जाणवली.

पुढे कधीतरी जेव्हा इराक शांत होईल, तिथले लोक जेव्हा पुन्हा सुखाने एकमेकांबरोबर न भांडता राहायला लागतील आणि तिथे पुन्हा एकदा शांतता नांदेल, तेव्हा मोसूलच्या मोहम्मदच्या घरी सवड काढून फिरायला जायचा बेत आम्ही पक्का केला. इराकमध्ये तू ये एकदा, म्हणशील स्वर्गात आलोय हे त्याचं म्हणणं मला भारतातल्या माझ्या काश्मिरी मित्रांसारखा वाटलं. खरोखर, जागा बदलतात, लोक बदलतात पण भावना त्याच असतात, दुःख तेच असत आणि वेदना सुद्धा त्याच असतात, याची प्रचिती पदोनपदी येत असते. माणुसकीचं नातं कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं हे वैश्विक सत्य मग अधोरेखित होतं आणि रक्ताच्या पलीकडची नाती अधिकाधिक घट्ट होत जातात !

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...