Skip to main content

लेबनीज रोमिओ

काही माणसं जन्माला येताना चिरतरुण म्हणूनच जन्माला येत असतात. त्यांचं पान पिकलं तरी देठ हिरवाच राहतो आणि काहीही झालं तरी त्यांच्यातला ' स्वप्नाळू रोमँटिक' तरुण शिळा होतं नाही. ही माणसं जातील तिथे 'प्रेमाचा वर्षाव' करण्यात मग्न असतात. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला असा एकमेव महाभाग म्हणजे माझ्याबरोबर माझ्याच ऑफिस मध्ये काम करणारा इमाद.

हा माणूस मूळचा लेबनॉन देशाचा. त्या देशाची राजधानी बैरूत हे त्याचं जन्मठिकाण. वडील लेबनीज असले तरी त्यांची जास्त सलगी इटली या युरोपमधल्या एकेकाळच्या महासत्तेशी, कारण पेशाने ते इटलीच्या दूतावासात काम करणारे लेबनॉन देशाच्या तिथल्या राजदूताचे सचिव. आयुष्याची सोळा-सतरा वर्ष इटलीमध्ये काढल्यामुळे असेल कदाचित, पण हा इमाद स्वतःला तिथलाच समजायचा आणि ८-१० वेळा अगदी वशिला लावून प्रयत्न करूनही इटलीचा नागरिकत्व न मिळाल्यामुळे हळहळ व्यक्त करत राहायचा. ' मी इटलीचा इटलीबाहेर जन्माला आलेला एक अस्सल इटालियन माणूस आहे' असं तो चारचौघात उघडपणे सांगायचं आणि अपरोक्ष इतर लेबनीज आणि अरबी लोकांच्या यथेच्छ शिव्या खायचा. कधी बाहेर एकत्र जेवायला गेलो तर ' मी फक्त इटालियन पद्धतीचं जेवण घेतो' अशी मखलाशी करायचा आणि ' इटलीने xxxx वर लाथ मारून घालवला तरी याला त्यांचेच तळवे चाटायला आवडणार' अश्या शेलक्या शब्दात मग त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल चर्चा रंगायची.

माझी आणि त्याची ओळख खूपच विचित्र पद्धतीने झाली. ऑफिसने रमझान ईदच्या निमित्त सगळ्या लोकांना छान मेजवानी दिली होती, तिथे हा माझ्या बाजूला उभा राहून समोरच्या वाढप्याला ' इटालियन मेनू आहे का?' असं विचारात होता. वाढप्याने नकारार्थी उत्तर दिल्यावर ' कसलं जेवण हे....इटालियन मेनू नाही तर खाताना असा वाटतं की आदिमानवांचं अन्न खातोय' असा तो थोड्या चढ्या आवाजात बोलला आणि आमच्या एका लेबॅनॉनच्याच मॅनेजरने ते ऐकलं. पुढच्या पाच मिनिटात त्या मॅनेजरने इमादला तोंडावर अरबी भाषेत खरी खोटी सुनावली आणि हा तरीही मॅनेजर गेल्यावर ' यांना खरं ऐकायची सवय नाही ना...' असा माझ्याकडे बघून बोलला. आता याच्या आगाऊपणामुळे आपल्याला सुद्धा उगीच कोणाकोणाच्या शिव्या खाव्या लागतील ,अशी चिन्हं दिसल्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला.

दुसऱ्या दिवशी मी लिफ्ट मध्ये पाय ठेवायला आणि याने मागून आत यायला एक गाठ पडली आणि हा माझ्याबरोबर पुन्हा बोलायला लागला. हळू हळू मला नको असूनही हा मला केसात च्युईंग गम चिकटावं तसा चिकटला. सामान्यतः चिकटलेलं च्युईंग गम काढता येत नाही, पण तिथले केस कापावे लागतात...माझी अवस्था त्या केसांसारखी झालेली होती. ऑफिसच्या बाकीच्या मंडळींनी इमाद आजूबाजूला नाही ना हे बघूनच माझ्यापाशी येऊन बोलायला सुरु केलं. एखाद्याला तोंडावर हाडतूड करणं माझ्या स्वभावात नसल्यामुळे मला या आगंतुक आलेल्या पाहुण्याला ना धड घरात घेता येत होतं, ना धड हाकलून देता येत होतं. त्यामुळे उंबरठ्यावर उभा करून त्याच्याशी जितक्यास तितकं बोलणं इतकंच माझ्या हातात उरलं होतं.

' मित्रा...' अशा संबोधनाने त्याच्या बडबडीची सुरुवात व्हायची. मी मित्र आहे हे त्याने स्वतःच ठरवलेलं होतं आणि मला ते स्वीकारण्यावाचून पर्याय सुद्धा ठेवला नव्हता. ' मी तुला सांगतो...युरोप म्हणजे स्वर्ग रे स्वर्ग...आणि स्वर्गातल्या अप्सरा कुठे आहेत माहित्ये? इटली मध्ये...कुठेही जा...फ्लोरेन्स, मिलान , तुरिन...आणि त्यात सुद्धा व्हेनिसला जाशील तर असा वाटेल तुला की अप्सरांमधल्या निवडक सुंदर तरुणींना देवाने त्या शहरात पाठवलंय रे...' माझ्या हातात कामाचा ढिगारा होता. त्याच्या या कधीही सुरु होणाऱ्या इटली-पुराणावर मी तसाही कंटाळलो होतो. त्यामुळे त्याला ' हो का...छान! ' असा उत्तर देऊन मी पुन्हा कामात डोकं घातलं.हा तसाच...' अरे, तुला काय माहित...तू बघितला नाहीयेस न रे त्यांना...नाहीतर देवाला तू म्हंटलं असतंस, की मला सुद्धा इटली ला का नाही जन्माला घातलास...' ' अरे इमाद, तू सुद्धा इटलीमध्ये नाही रे जन्माला आलायस...आणि सगळ्यांना देव इटली मध्ये कसा जन्माला घालेल? बाकीच्या जागा काय मग ओसाड ठेवणार का देव?" इमादवर त्या त्राग्याचा ढिम्म परिणाम झालं नाही. ' माहित्ये रे मित्रा...पण तुला माहित्ये, देव माणसं बनवत असताना कधीतरी मूडमध्ये आला की खास मुली तयार करतो...आणि त्यांना तिथे जन्माला घालतो. तू काय आणि हे बाकीचे आजूबाजूचे काय, तुम्ही देवाची नावडती प्रजा रे! '' ' आणि तू काय? ' ' अरे, देवाला त्याने माझ्या बाबतीत केलेली चूक कळली रे...म्हणून बघ, मला शेवटी पोचवलाच त्याने तिथे...' मी थक्क झालो. या त्याच्या बोलण्यावर माझ्याकडे खरोखर उत्तर नव्हतं, म्हणून मग कोणालातरी हातातले पेपर्स द्यायच्या निमित्ताने मी तिथून उठलो आणि एकदाची ती इमादची ब्याद ऑफिसमध्ये दुसरं सावज शोधायला गेली.

या माणसाने चाळीशी पार करूनही दोनाचे चार केले नव्हते. त्यामुळेच असेल, पण चारचौघात बोलायचा पोच त्याला नव्हताच. त्याने मला एकदा त्याच्या फोनमध्ये पंधरा-वीस मुलींचे फोटो दाखवले होते आणि या सगळ्या माझ्या ' girlfriends' होत्या असं शपथेवर सांगितलं होतं. ' इटली रे...एक गेली, दुसरी मिळते. आणि पहिली सुंदर म्हणावी तर पुढची त्याहीपेक्षा सुंदर...आणि मी काय, आर्कीटेक्ट आहे ना...सौंदर्य मला असा खुणावतं...' असा कुठल्यातरी स्वप्नात हरवून जात तो बोलत राहिला आणि मागून आमचा मॅनेजर आल्याचंही त्याला भान उरलं नाही. शेवटी त्या मॅनेजरने कचकावून दिलेला दम खाऊन स्वारी नेहेमीच्या सवयीप्रमाणे आपल्या जागेवर बसली.

इटालियन शिल्पकला, चित्रकला, वास्तुकला आणि तिथे झालेलं कलेचं पुनरुत्थान यावर अभ्यासक्रमात मी खूप काही शिकलो होतो, परंतु त्या सगळ्या 'अमूर्त' कलांना तिलांजली देऊन 'मूर्त' कलांचा आजन्म अभ्यास करणारा हा महाभाग माझ्यासाठी जगातला आठवं आश्चर्य होता. कामानिमित्त एकदा असंच एकत्र बाहेर गेलो होतो, तेव्हा परतताना याने मला जवळ जवळ ओढत एका क्लब मध्ये नेलं. तिथल्या असंख्य ललना याला बघून त्यांची अगदी शाळूसोबत असल्याप्रमाणे त्याच्याकडे धावत आल्या आणि हा मनुष्य ऑफिस च्या व्यतिरिक्त मिळालेल्या वेळात नक्की काय करतो याचं मला उलगडा झाला.

' ती बघ...तिचा नाव आहे मर्लिन. तिचा नाक मला खूप आवडतं...इटालियन पद्धतीचा वाटतं ना?' ' ती सिंडि...काय कमनीय आहे बघ....अंगावर गुंजभर जास्त नाही...' या माणसाची अखंड टकळी सुरु होती.तासभर बसून, त्या ललनांबद्दल 'नको ती' माहिती घेऊन आणि ' तुला एखादी हवी असेल गर्लफ्रेंड म्हणून तर सांग' अशी खुली 'ऑफर' घेऊन मी त्या दिवशी तिथून निघालो आणि पुन्हा या माणसाबरोबर कुठेही गाफीलपणे जायचं नाही असं मी स्वतःलाच बजावलं.

एके दिवशी त्याने मला अचानक एक चॉकलेट्सचा मोठा डबा आणून दिला. ' मी आणि लिसा एका घरात राहणार आहोत आता...लिव्ह इन रिलेशनशिप ' अशी नवी खबर त्याने मला दिली. ही लिसा कोण हे मला कळलं नाहीच, पण सवयीप्रमाणे बढाया मारत त्यानेच माहिती पुरवली. ' अरे मला ती ४ महिन्यांपूर्वी भेटली रे...आणि आमचं सूत जुळलं. पण मी स्पष्ट सांगितलं...लग्न नाही. मी अडकण्यासाठी जन्म घेतलेला नाहीये...तर ती सुद्धा खूष झाली..म्हणाली मी पण...'  इमादसारखी असंख्य कार्टी जगात निपजलेली आहेत, हे मला या निमित्ताने कळलं. ढवळ्याशेजारी आता ही पवळी बांधली गेली.....खरंतर सोडली गेली होती. या दोघांचा वाण आणि गुण कोणालाही लागू नये अशी मी मनोमन प्रार्थना केली.

काही महिन्यातच त्या दोघांचा बिनसल्याचं आणि परस्परसंमतीने दोघांनीही आपापली वाट धरल्याची अपेक्षित बातमी आलीच. ती पवळी इटलीची नव्हती म्हणून कि काय, पण या ढवळ्याला फळली नाही. राहत्या घरातून ढवळ्याच बाहेर पडला ( बहुधा हाकलला गेला ) आणि नवं घर मिळेपर्यंत त्याने एका हॉटेल मध्ये बस्तान बसवलं. सगळं ऑफिस हसत असूनही याला काहीही वाटलं नाही आणि निर्लज्जपणे पुढच्याच महिन्यात आपलं नवं सूत जुळल्याची बातमी त्याने बढाया मारत सगळ्यांना दिली. ' एकाच फुलातला मध किती खाणार...मध संपतोच ना कधीतरी...म्हणून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात राहायचं' असा कोडगेपणाने सगळ्या डिपार्टमेंटसमोर जेवणाच्या वेळी तो बोलला आणि आम्ही सगळ्यांनीच मनोमन कपाळावर हात मारून घेतला.

हे फुलाफुलांवरून उड्या मारणं  सुरूच असताना एकदा त्याच्या आयुष्यात एक अतिशय वाईट घटना घडली. गाडीच्या अपघातात पायाचं आणि हाताचं हाड मोडल्यामुळे १ महिना हा महाभाग इस्पितळात पडून होता. तिथे सुद्धा आम्ही भेटायला गेल्यावर कोणत्या नावाची कोणती परिचारिका मोनालिसा सारखी दिसते असल्या फालतू माहित्या त्याने मूळ स्वभावाला अनुसरून आम्हा लोकांना पुरवल्या. चुकून याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करायची वेळ आलीच, तर x - ray मध्ये त्याच्या कवटीत फक्त सुंदर आणि मादक मुलींचे फोटो आणि पत्तेच सापडतील अशी दाट शंका मला येऊन गेली.

या माणसाला आमच्या ऑफिसने २ वर्षांसाठी बदली करून दुसऱ्या देशात पाठवलं. तिथेही स्वतःच्या लौकिकाला साजेशी कामगिरी ऑफिसच्या बाहेर करून  वर आम्हाला मोबाईलमध्ये त्या प्रकरणांचे मेसेज पाठवून फुकटच्या फुशारक्या मारायच्या काही त्याने सोडल्या नाहीत. शेवटी परत आल्यावर त्याने आम्हाला चक्क तो लग्न करणार असल्याची अनपेक्षित बातमी दिली आणि आम्ही उडालो. आधी विश्वास ठेवणं अवघड होतं पण त्याने त्याच्या साखरपुड्याची अंगठी आणि फोटो दाखवल्यावर आमची खात्री पटली. या खुशालचेंडू भुंग्याला एका फुलावर बसून राहायची बुद्धी नक्की कशी झाली, हे मला जाणून घ्यायची उत्सुकता होतीच...त्यामुळे मी मोका साधत त्याला तसा थेट प्रश्न केलं.

' काय सांगू मित्रा....' साहेब मूळपदावर आले. ' कधीतरी थांबावं लागताच रे सगळ्यांना...किती पळणार...'

' हे तू बोलतोयस? दोन वर्षात काय 'शाकाहारी' झालास कि काय?'

' अरे नाही मित्रा....थोडीशी गडबड झाली. '

' काय? '

' अरे, आई-वडील आलेले भेटायला...मला खूप समजावलं त्यांनी...नाही म्हंटल्यावर बापाने इस्टेटीतून बेदखल करायची धमकी दिली.....शेवटी त्यांच्यासाठी रे...पण तयार व्हाव लागलं!'

' पण आता तुझ्या त्या उरलेल्या फुलांचा काय?' मी त्याला खिजवण्याच्या दृष्टीने बोललो.

' मित्रा, चालतं...लग्नाला येणार का ?' त्याने विचारलं. लग्न बैरुत मध्ये होतं. तिथून चतुर्भुज होऊन आल्यावर फोटो दाखवताना बायकोच्या मैत्रिणींचे आणि 'दूरच्या' बहिणींचे फोटो तो ज्या पद्धतीने दाखवत होतं ते बघून सुम्भ जळला तरी पीळ कायम आहे हे मला कळत होतं. ऑफिस मधल्या अनेकांनी त्याला तू मधुचंद्रासाठी कुठे जाणार म्हणून विचारून त्याला चिडवायचे प्रयत्न केलं. पण मला ते करण्याची गरज नव्हती. या रोमिओची धाव इटलीपर्यंतच जाणार याची मला खात्री होती.

एकदाची पायात बेडी पडल्यावर हा पुष्कळसा माणसात आला. नेहेमीच्या विषयांव्यतिरिक्त बाकीसुद्धा  बरंचसं बोलायला लागला.त्याच्या बायकोने त्याला बऱ्याच प्रमाणात  लगाम घातल्याचा आमच्या लक्षात यायला लागलं. एक-दोन वेळा चक्क घरी जाताना घरचं सामान घेऊन जाताना त्याला बघितलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. एकदा गाडी आणलेली नसल्यामुळे त्याने मला त्याच्या घरापर्यंत सोडायची विनंती केली. मी त्याला नेहेमीच्या रस्त्यावरून घेऊन जाणार, तोच त्याने मला एका वेगळ्या रस्त्याने जायची विनंती केली.

ज्या रस्त्यावरून आम्ही गेलो, तिथे असलेल्या अनेक हॉटेलमधल्या क्लबकडे तो बघत होता.अचानक त्याच्या तोंडून ' मित्रा...' असे शब्द उमटले आणि पुढे काहीही न बोलता तो शांत राहिला. लग्नाची हळद सुद्धा त्या हिरव्या देठाला आपल्या रंगात रंगवू शकली नव्हती !


 


 










Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...