Skip to main content

बहाई फकीर

जेरुसलेम हे शहर इतिहासात अनेक वेळा भरडलं गेलेलं एक अभागी शहर.  ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्माचा उगमस्थान असलेलं आणि त्यामुळेच सतत अशांत. या तीन धर्माच्या लोकांनी आपापसात इतक्या लढाया केल्या, कि इतिहासाची अनेक पानं  त्यात रक्ताळली गेली.आज हजारो वर्षांनंतरही हा 'तिढा' कायम आहे आणि आजसुद्धा या तीन धर्माचे लोक या शहराच्या आणि आजूबाजूच्या प्रदेशावर निरंकुश सत्ता मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहेत.

याच भूभागाशी संबंध असलेला अजून एक धर्म म्हणजे बहाई धर्म.या तीन मुख्य प्रवाहांमध्ये काहीसा दुर्लक्षित राहूनही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकलेला हा धर्म तसा अलीकडचा.१८४४-४५ साली जन्माला आलेला आणि सुरुवातीला इराणमध्ये वाढलेल्या या धर्माचा संबंध जरी अब्राहम या इतर तीन धर्माच्या मूळपुरुषाशीच असला, तरी या धर्माचा पाया आधुनिक विचारांच्या ' अली मुहम्मद शिराझी ' यांनी घातलेला असल्यामुळे या धर्माचे लोक तसे कट्टरतावादापासून अलिप्त असतात.

रुस्तम असं पर्शियन नाव असेलला, इराणच्या इस्फाहान शहरात जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या या अवलियाची आणि माझी भेट एका मशिदीबाहेर झाली. दुबईच्या ऊद मेथा भागात असलेली एक मशीद मला आराखड्याच्या दृष्टीने अनेक दिवस बघायची इच्छा होती. एके दिवशी वेळ काढून मी त्या मशिदीच्या मुस्लिमेतर लोकांना जायला परवानगी असलेल्या भागात गेलो आणि बाहेर एका छोट्या चबुतऱ्यावर मला एक विलक्षण दृश्य दिसल्यामुळे मूळ कामच विसरलो.

डोक्यावर अरबी पद्धतीचं मुंडासं, अंगावर शुभ्र पांढरे कपडे, पायात सपाता, गळ्याभोवती गुंडाळलेला मातकट रंगाचा लांब सुती रुमाल आणि हातात रबाब म्हणून ओळखल जाणार एक तंतुवाद्य, अशा अवतारातला हा गोरागोमटा आणि गर्दीत आपल्या आकर्षक रूपरंगाने उठून दिसेल असा मनुष्य आजूबाजूला काय सुरु आहे याची यत्किंचित पर्वा न करता अतिशय गोड आवाजात गात होता. अनेक लोक त्याचा गाणं ऐकायला जमले होते. कोणी त्याच्या गायनाची तर कोणी त्या रबाबातून उमटत असलेल्या सुरांची तारीफ करत होते.दहा-पंधरा मिनिटं त्याने त्याचं ते भारावून टाकणारं गाणं गायलं आणि शेवटी स्वतःच्या मनात आलं म्हणूनच त्यानं ते थांबवलं.

हा अवलिया नक्की आहे तरी कोण, म्हणून मी गर्दीची पांगापांग झाल्यावर त्याला भेटलो आणि त्याच्याबरोबर थोडा वेळ बोलायची इच्छा बोलून दाखवली. तो आपल्या मर्जीचा मालक आहे, याची खूणगाठ मनात बांधून त्याच्या कलेने घेत त्याला थोडा वेळ विचार करू दिला आणि शेवटी त्याची परवानगी मिळवली. तर्हेवाईक लोकांना भेटून त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवायची मला खूप जुनी सवय आहे, पण या मनुष्याच्या बाबतीत मात्र मी थोडासा गोंधळलो होतो.

' आपण नक्की कुठले? आणि इथे बसून गात होता ते नक्की कशासाठी? ' मी पहिल्या प्रश्नाचं खडा टाकला. तो मंद हसला आणि त्याने अस्खलित इंग्रजीत मला स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली.

' रुस्तम इस्फाहानी हे माझा नाव, मी बहाई धर्माचा एक क्षुद्र फकीर आहे आणि जेव्हा मला त्या सर्वोच्च शक्तीशी संवाद साधायचा असतो, तेव्हा मी माझ्या रबाबवर सूर धरतो आणि गाण्याच्या माध्यमातून तो साधायचा प्रयत्न करतो. '

हा फकीर माणूस आपल्या देशातून परागंदा झाल्यावर शेवटी फ्रान्समध्ये स्थायिक झाला. कधीही लग्न वगैरे करायच्या फंदात तो पडलाच नाही. आपल्या घरच्या लोकांपासून दूर एकटा स्वतःच्या मर्जीने त्याने संगीतात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न स्वीकारता युरोप मध्ये अनेक ठिकाणी उमेदवारी करत फिरला आणि आता पूर्णवेळ भटकंती, संगीताच्या शिकवण्या आणि मनात येईल तिथे काही दिवस मुक्काम ठोकून तिथल्या संगीताबद्दल अधिकची माहिती गोळा करणं असं स्वच्छंदी आयुष्य जगणं त्याने सुरु केलं.

या माणसाकडे स्वतःचं घर, गाडी, जमीनजुमला आणि पैसाअडका असं काहीही नव्हतं. कदाचित होतं ते सुद्धा त्याने दानधर्मात किंवा देणगी स्वरूपात स्वाहा करून टाकलेला असावं, कारण या सगळ्याचा ओझं नसल्यामुळे आपण आनंदात जगू शकतो असं त्याचं म्हणणं होतं. वर्षातून एकदा ' बा'ब ' नावाच्या इस्राएल मधल्या हैफा प्रांतात असलेल्या बहाई धर्माच्या पवित्र मंदिरात तो २-३ आठवडे फक्त सेवा म्हणून अन्न  शिजवणं, येणाऱ्या-जाणाऱयांना पाणी देणं आणि त्यांची राहायची व्यवस्था करणं अशी काम करायचा. बगदाद, दमास्कस, बेरूत अशा अनेक जागी तो अशांतता असूनही जायचा.बहाई धर्माचं महत्वाचा स्थान असलेलं 'कार्मेल' डोंगरात त्याला बहाई धर्मासाठी एक विनामूल्य धर्मशाळा बांधायचा त्याचं स्वप्न होतं.

मुळात ईश्वराचं अस्तित्व मानत असूनही ईश्वराच्या प्रतीकात्मक आणि म्हणूनच काहीशा वैश्विक रूपावर जास्त प्रेम करणाऱ्या या धर्मामध्ये शीख लोकांच्या अनेक गोष्टी मला दिसत होत्या. कदाचित त्यामुळेच असेल, पण स्वतःच्या मायदेशातून परागंदा होऊन सुद्धा हा फकीर मनात कोणतीही कटुता न बाळगता फक्त आणि फक्त चांगल्याच्याच मागे लागला होता.' हे विश्वाची माझे घर' या उक्तीमध्ये अभिप्रेत असलेली कृती त्याच्या प्रत्येक गोष्टीत दिसत होती.

पुढच्या ४-५ दिवसाच्या मुक्कामात हा मला अनेक वेळा भेटला.कधी बर दुबईच्या जुन्या घरांमधल्या गल्लीत, कधी त्या गल्ल्यांच्या अगदी विरुद्ध थाटाच्या चकचकीत मॉलमध्ये तर कधी दुबईच्या खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या शांत काठावर भटकता भटकता आम्ही भरभरून बोललो. नुसत्याच बहाई नाही, तर अनेक धर्माचा गाढा अभ्यास त्याने केला होतं आणि भारताच्या विविध धर्माच्या आणि पंथांच्या अनेक गोष्टींची त्याला माहिती होती। सुफी तत्त्वज्ञानाच्या गूढवादाने त्याला चांगलाच प्रभावित केलं होतं आणि जे लोक कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांनी किमान ईश्वराच्या संकल्पनेवर तरी विश्वास ठेवावा असा त्याचा आग्रह होता.

' ईश्वराला धर्म चिकटला, कि चालीरीती आपोआप येतात. मग त्यातून कोणाच्या चालीरीती जास्त चांगल्या, याची स्पर्धा आणि शेवटी त्या स्पर्धेत कोण जिंकणार याची चढाओढ लागून सगळं अध्यात्मापासून दूर जातं. धर्म मनुष्याने तयार केलाय, ईश्वराने नाही. जरी हिंदू लोक ईश्वराची अनेक रूप मानत असले आणि आम्ही बहाई लोक ईश्वराला अमूर्त रूपात मानत असलो तरी त्यात कोण योग्य आणि कोण अयोग्य हे शोधायची गरजच काय? ' त्याचा रोकडा सवाल.

एकदा इराकमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने त्याला केवळ रुस्तम त्याच्या धर्माचा नाही म्हणून त्याच्या कपाळावर बंदूक रोखली. हे नुसतं ऐकून अंगावर शहारा आला. पण त्याने शांतपणे मला पुढची कहाणी सांगितली.

" मी त्याला म्हंटलं, " अरे , मला गोळी घालून तुला तुझा धर्म राखता येणार असेल तर नक्की तसं कर, कारण माझ्या जाण्याने माझा धर्म नष्ट नाही होणार। त्यापेक्षा आपण एकत्र कॉफी पिऊया का? " आणि तो अवाक झाला. शेवटी मला काहीही न करता तो निघून गेला."

गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाच्या इतकं जवळ जाणारं त्याचं हे वर्तन विलक्षण होतं. जे ऐकताना माझा ठोका चुकला, ते सांगताना तो एखाद्या निष्काम कर्मयोग्यासारखा अविचल होता.

रबाब त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं होतं. इराणच्या १९७० च्या राजकीय वावटळीची प्रचंड झळ त्याच्या कुटुंबाला लागली होती. आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन बहिणी असा सगळा कुटुंबकबिला एका रात्रीत युरोपमध्ये निघून गेला होता. बहाई धर्माच्या अनेकांनी एका पैचीही अपेक्षा न ठेवता त्यांना मदत केली होती आणि म्हणूनच पैसा आणि मानमरातब यापासून तो अलिप्त झाला होता. त्याची अध्यात्मिक बैठक पक्की असली, तरी व्यवहारशून्य नव्हती. नुसता देव देव करत निष्क्रिय बसून आयुष्य फुकट घालवणं त्याला जराही आवडत नव्हतं. ' अरे त्यापेक्षा अतिरेकी काय वाईट? काहीतरी करतात तरी....चुकीचं असलं तरी काय झालं ? ' हा त्याच्या प्रश्न अनेकांना उमजणारा नसला तरी मला त्या प्रश्नाने विचार करायला भाग पाडलं होतं.

आम्ही खायला प्यायला बसलो तेव्हा त्याने मला मी शाकाहारी कसा म्हणून विचारलं आणि ' धर्मासाठी जर हे करत असशील तर त्याच्या त्या ईश्वराशी काहीही संबंध नाही....पण तुझ्या तत्वांना जर मांस खाणं पटत नसेल, तर जरूर शाकाहारी राहा' असा स्पष्ट सांगून तो आनंदाने त्याच्या ताटातलं मटण खायला लागला.अपेयपान त्याला वर्ज्य नव्हतं पण त्याला त्याची तलफही नव्हती. त्याला नशा फक्त आणि फक्त त्या ईश्वरी शक्तीपर्यंत पोचायची होती आणि संगीत हे त्याचं माध्यम होतं. मी त्याला माझ्याकडची लतादीदींनी गायलेली भक्तिगीतं ऐकवली आणि तो अक्षरशः वेड लागल्यासारखा ' अजून एक, अजून एक  ' म्हणत तास-दीड तास ऐकत राहिला. मग आपल्या राबाबवर त्याने ती गाणी वाजवली आणि एका वैश्विक सुरांची दुसर्या वैश्विक सुरांशी गळाभेट झाल्याची अनुभूती मला भरभरून मिळाली। लतादीदींचा पसायदान त्याने माझ्या समोर ५-६ वेळा ऐकलं आणि शेवटी डोळे बंद करून त्याने ५ मिनिटं काहीही न बोलता फक्त त्या स्वरांमध्ये, शब्दांमध्ये आणि अनुभूतीमध्ये मनसोक्त डुंबून घेतलं. डोळे उघडून ' आज मी बहुतेक माझ्या ईश्वराच्या समोर उभा राहून आलोय....' असे शब्द त्याच्या तोंडातून सहज बाहेर पडले आणि मी ज्ञानेश्वर माउलींना, लतादीदींना, बाळासाहेबांना आणि त्या पसायदानात सामील असलेल्या सगळ्यांना मनोमन साष्टांग नमस्कार केला.

४-५ दिवसांनी ज्या दिवशी तो दुबईहून प्रयाण करणार होतं, त्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो. जाताना लतादीदींच्या माझ्याकडे असलेल्या सगळ्या भक्तिगीतांची, संतवाणीची आणि मीरा, कबीर , गालिब वगैरेंच्या रचनांची एक DVD मी त्याला भेट म्हणून घेऊन गेलो. त्याने मला त्याच्या त्या रबाबाची एक छोटी प्रतिकृती दिली आणि मला विसरून जा, फक्त आपली भेट घडवून देणाऱ्या तुझ्या आणि माझ्या एकाच असलेल्या त्या ईश्वराचे आभार मान असं सांगितलं. या माणसाने आयुष्यात विरक्ती साध्य केली होती, त्यामुळे ताटातूट, आठवणभेट वगैरे गोष्टी त्याच्यासाठी गौण होत्या. ' त्याच्या ' मनात असेल, तर भेटू नाहीतर वाईट वाटून घेण्यापेक्षा सरळ ' त्यालाच ' प्रार्थना कर असं जगावेगळं तत्वज्ञान मला त्याने इतकं सहज सांगितलं की मला त्या माणसाची कमाल वाटली.

ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान त्या राबाबच्या प्रतिकृतीतून मला मिळाल्याची भावना माझ्या मनात दाटून आली. मी हॉटेलमधून बाहेर पडलो आणि थेट मंदिरात जाऊन तो रबाब मी 'माझ्या' देवापुढे - श्रीकृष्णापुढे - ठेवला आणि मोबदल्यात त्या फकिराला त्याच्या ईश्वरापर्यंत पोचवायची प्रार्थना केली। मला त्याला पुन्हा एकदा भेटायची इच्छा मला मागता आली असतीही, पण ती मागून मला त्या रबाबाचा अपमान करायचा नव्हता !

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...