Skip to main content

उंटावरचा शहाणा

वाळवंटात केवळ ३०-४० वर्षांमध्ये स्वर्ग उभारला जाऊ शकतो, यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच...पण दुबईमध्ये या चमत्काराची प्रचिती पावलोपावली येते. 1971-72  साली शेख झाएद नावाच्या द्रष्ट्या आणि नेमस्त वृत्तीच्या मनुष्याने आजूबाजूच्या टोळ्यांना एकत्र आणून यूएई नावाचा देश जन्माला घातला आणि बघता बघता या देशातल्या सात अमिरातींनी जगाच्या नकाशावर आपला नाव कोरलं. या देशाच्या जगात सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या शहरामध्ये - दुबई मध्ये - पर्यटकांसाठी खास तयार केलेल्या स्थानिक आकर्षणांपैकी एक म्हणजे वाळवंटातली ' सफारी'. माझ्या आयुष्यात मी केलेली पहिली सफारी नुसत्याच अनुभवांमुळे नाही, तर मला तिथे भेटलेल्या एका विक्षिप्त, मनस्वी आणि खुशालचेंडू माणसामुळे सुद्धा संस्मरणीय ठरली.

अब्दुल मुसा असं नाव असलेला हा माणूस मूळचा ओमान मधल्या निझवा गावचा रहिवासी. केरळ या भारताच्या एका सुंदर राज्यातून अनेक वर्षांपूर्वी त्याच्या आजोबांनी ओमान देशात बस्तान हलवलं आणि नंतर ते कुटुंब तिथलंच झालं. लहानपणापासून उडाणटप्पू असल्यामुळे फारसा शिकला नाही . बापाने पदरच्या तीन मुली उजवल्यावर आपल्याच ओळखीतल्या कोणाच्यातरी मुलीशी आपल्या या एकुलत्या एका चिरंजीवांचं लग्न लावून दिलं. दोन नातवंडांचा तोंड बघून समाधानाने तो अल्लाहच्या वाटेवर निघून गेला आणि चिरंजीवांनी राहतं घर, त्यामागची छोटीशी खजुराची बाग आणि घरात पाळलेला एक उंट, चार-पाच बकऱ्याचा कळप आणि एक बहिरी ससाणा अशा भरभक्कम वडिलोपार्जित संपत्तीवर एकमेव वारसदार म्हणून मांड ठोकली.

पुढे अब्दुलच्या घरात अजून ३ - ४ अपत्यांची वाढ होऊन त्या घरातली एकूण प्राणीसंपदा ( चार आणि दोन पायांचे प्राणी एकत्र केल्यास ) डझनावर गेली आणि शेवटी पोटापाण्याच्या सोयीसाठी स्वारी घराबाहेर पडली. शिक्षणाची बोंब आणि अंगमेहेनतीचं वावडं यामुळे अनेक जागी थोडा थोडा वेळ काम केल्यावर शेवटी एका मित्राच्या ओळखीने हा दुबई मध्ये एका पर्यटन कंपनी मध्ये पूर्णवेळ नोकरीला लागला आणि एकदाचा त्या नोकरीत रमला. हिंदी, पशतू, उर्दू, अरबी, इंग्रजी आणि तुर्की इतक्या भाषा हा शिकला आणि मूळ गावच्या आपल्या प्राणी सांभाळायच्या अधिकच्या कौशल्यामुळे दुबईला येणाऱ्या पर्यटकांना वाळवंटातली सफर घडवायच्या कामगिरीवर पूर्णवेळ रुजू झाला.

' ये ऊंट है , संभल के बैठो...' अंगाने चहूबाजूंनी विस्तारलेल्या आणि स्वतःला पौगंडावस्थेत समजून त्याच वयाचे चाळे करत असलेल्या एका भारतीय नवरा-बायकोला तो आपल्या परीने सावध करायचा प्रयत्न करत होता. त्या दोघांनी त्याकडे लक्ष ना देता त्या उंटावर चढून बसायची कसरत एकदाची पूर्ण केली. हे ओझं घेऊन हा उंट नक्की उठू शकेल का, अशी शंका मनाला चाटून गेली तोच त्या उंटाने त्याचं पार्श्वभाग उचलून वर केला. ' अगं' तिच्या अहोंवर पडली आणि मग दोघेही त्या उंटावरून खाली वाळूत धारातीर्थी पडले. ' अहो ' आपल्या अजस्त्र 'सौ' च्या अंगाखाली आल्यामुळे जवळ जवळ गाडलेच गेल्यात जमा होते आणि आपल्या सहधर्माचारीणीपेक्षा अंगावर उंट पडलेला परवडला अश्या केवीलवाणेपणे फुटेल तशा सुरात ओरडत होते. शेवटी त्यांना उचलून आणि त्यांचे उंटाच्या सफारीसाठी घेतलेले पैसे परत करून अब्दुल माझ्याकडे आला. मी त्याचा पुढचा ' कस्टमर' होतो. विमानात जश्या पद्धतीने आपत्कालीन परिस्थितीत काय करायचा हे प्रत्येक वेळी सांगतात, तास हा प्रत्येकाला उंटावर बसताना सावध करत होतं. माझी सफारी झाल्यावर त्याने मला बाजूलाच कॉफी प्यायला नेला आणि आमच्या गप्पांची मैफिल सुरु झाली.

' आता नही तो भी बैठता है...ऊंट क्या कुत्ता है या बिल्ली? '

' अरे अब्दुलभाई, कुत्ता-बिल्ली पे भी कौन बैठता है? क्या आप' मी मुद्दाम त्याला डिवचलं.

' अरे भाईजान, मै बोला उनको, लेकिन ध्यान कहा...वो मेरे ऊंट पे गिरते तो वो बेचारा मर नाही जाता? ऊंट से भारी थे वो दोनो....' आणि अक्ख्या शहराला ऐकू जाईल अश्या आवाजात तो खो खो हसला. ' मैने अपने ऊंट को लात मारनेको सिखाया है मालूम? तुम फोटो लेने जायेगा तो वो लात मारेगा...' दोन मिनिटं माझ्या गोंधळलेल्या चेहेऱ्याकडे बघून पुन्हा तो खो खो हसला आणि ' मजाक किया भाईजान...' म्हणून खांद्यावर थाप मारली.

या मुलखावेगळ्या माणसाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायची माझी इच्छा होती, म्हणून मी त्याला ' मै आपके साथ हि पूरी सफारी करुंगा , चलेगा ना?' म्हणून त्याला मधाचा बोट लावलं आणि वर ' तुम मस्त आदमी है अब्दुलभाई' म्हणून थोडीशी सलगी वाढवली. साहेब एकदम मूड मध्ये आले आणि धरणाचे दरवाजे उघडल्यावर जसा धो धो पाण्याचा प्रवाह सुरु होतो तशी याची टकळी सुरु झाली.

' आप इंडिया या पाकिस्तान से?'
' इंडिया से...मुंबई से'
' लेकिन आप काले नाही है..'
' अरे इंडिया के सब लोग एक जैसे नही होते...और गोरा-काला क्या फर्क पडता है? '
' ऐसा कैसा...गोरा होगा तो मै ज्यादा पैसे लेंगा सफारी का....वो भी डॉलर मै'

समोरच्याला मुद्दाम तिरकस विचारून कात्रजचा घाट दाखवायचं त्याचं कौशल्य जबरदस्त होतं. प्रत्येक प्रश्नाचं त्याच्याकडे उत्तर तयार होतं. बोलताना सभ्यता, शालीनता वगैरे गोष्टी औषधालाही नव्हत्या आणि थेट विषयाला हात घालताना समोरचा दुखावेल याची फिकीर सुद्धा नव्हती.

' ये मेरा अली..' आपल्या एका मित्राच्या हातातला बहिरी ससाणा स्वतःच्या हातात घेऊन मला त्याने ओळख करून दिली. ' साला हर दिन अलग अलग लडकी के पीछे उडता था...मै देखता था उडते हुए इस्को...एक दिन पकड लिया...अब देखो, लोग आते है फोटो लेने और पैसे मिलता है हमको...इसलिये लडकी का चक्कर अच्छा नही दोस्त...' उडणाऱ्या ससाण्याकडे पाहून तो नर आहे कि मादी, रोज जिच्या मागे तो लागतो ती मादी एकच कि वेगळी हे इतकं त्याला कसा कळलं आणि त्या गोष्टीचा संबंध एकदम अध्यात्माशी त्याने कसा जोडला हे माझ्यासाठी अनाकलनीय होतं.

तितक्यात एका युरोपिअन जोडप्याला त्याने तो ससाणा हातात घेऊन फोटो काढू दिला आणि त्यांना ' my  bird  likes  beautiful  ladies ...see , He is happy ' असं बिनधास्त बोलून वरून त्याने त्या पक्ष्याची चोच कशी हसल्यामुळे वेगळी दिसतेय ते दाखवलं. त्या युरोपियन दाम्पत्याने ' oh yes...wow '  म्हंटल्यावर ' ये गोरे लोक बेवकूफ देख कैसे बनते है ' असं म्हणत अभिमानाने माझ्याकडे बघितलं. हा आगाऊ माणूस एके दिवशी कोणाचा तरी बेदम मार खाणार अशी माझी तिथल्या तिथे खात्री पटली.

वाळवंटात गाडीने  sand dunes ride करताना याने इतक्या वेड्या वाकड्या कसरती केल्या कि मागे बसलेल्या एका बाईने गाडी थांबल्यावर चक्कर आल्यामुळे जागेवरच बसकण मारली. तिला पाणी देताना ' और आधा घंटा  करने वाला था...आपके लिये जल्दी रुक गया' असं त्याच्या त्या पहाडी आवाजात बोलून तो निघाला. मागे त्या बाईच्या व्यतिरिक्त जे जे होते, त्यांनी त्या बाईला कळेल अशा आवाजात कुरकुर 'ऐकवून दाखवली' आणि हा माझ्याकडे येऊन ' अब वापस नही बैठेगी देख किसी भी गाडी मे ' असं हसत हसत पुटपुटला. नारदमुनींचा अरबस्तानातला हा अवतार बघून मी त्याला मनातल्या मनात कोपरापासून नमस्कार केला आणि त्याच्या मागून निमूटपणे चालायला सुरुवात केली.

शेवटी अरबी लोकांचा खास नृत्यप्रकार म्हणजे ' belly dance ' सुरु झाला. त्याने मला त्याच्याच बाजूला गादीवर ऐटीत लोडाला टेकवून वगैरे बसवलं आणि समोर खजूर, द्राक्ष आणि सरबत आणून ठेवलं. कमनीय बांध्याच्या त्या सुंदर आणि लवचिक नृत्यांगना बघून माणसं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होती आणि हा मला त्यातली कोण कुठच्या देशाची आहे, कोणाचं  आपल्या ऑफिस मधल्या कोणाबरोबर 'सूत' जुळलेलं आहे आणि कोण वागायला अतीशहाणी आहे  याचा रसभरीत वर्णन करायला लागला. त्यातल्या एका पांढर्या शुभ्र वर्ण असणाऱ्या मुलीचं आपल्या ऑफिसच्या तितक्याच अव्वल वर्ण असणाऱ्या मॅनेजर बरोबर जुळलंय, हे सांगताना ' सफेद कागज पे कार्बन पेपर रखा हुआ दिखेगा ना रे? और शादी का अल्बम भी साला पूर ब्लॅक अँड व्हाईट लागेगा ना?' असा बेमालूम प्रश्न मला त्याने विचारला आणि जवळ जवळ पाच मिनिटं मी गडाबडा लोळून हसलो.

शेवटी जेवताना ' तुम अंडा भी नाही खाता है?' म्हणून माझ्या शाकाहारी असण्यावर प्रश्न करून वरून ' ओमान मै मेरे घर को कभी आयेगा तो तुझे और मेरे बकरियों को एक प्लेट मे खाना देगा' अशी वरून मला ठेवून दिली. हातात छान खरपूस भाजलेला मटणाचा तुकडा घेऊन ' ये नही खाया तो अल्लाह माफ नही करेगा...जहन्नुम मै जायेगा दोस्त' म्हणून मला सामिष जेवणाचं आमिषही दाखवायचा प्रयत्न केला. तितक्यात रोट्या संपल्या म्हणून कटकट करणाऱ्या दोन-तीन जणांना ' पाच मिनीट सब्र करो भाईजान...घर मे बीवी को ऐसा बोलोगे तो रोटी नही मिलेगी मार मिलेगी' म्हणून गार केला आणि स्वतः रोटी तयार करणाऱ्या खानसाम्याला  ' और देर करेगा तो ये लोग तुझे ही तंदूर मै डालेंगे...जल्दी कर' म्हणून दटावलं सुद्धा.

हा माणूस खर्या अर्थाने त्या desert safari च्या भागाच्या छोटेखानी साम्राज्याचा अघोषित मालक होता!

निरोपाची वेळ अली तसा हा थोडासा विरघळला. काही बोलल्याचा त्रास झाला असेल तर माफ कर म्हणून मला त्याने मिठी सुद्धा मारली आणि म्हणाला, ' महिन्यातून दोन दिवस घरी जायला मिळतं...इथे माझी खोली आहे पण एकटा असलो की वेड लागतं...म्हणून मग काम करताना मी पण हसत राहतो, बाकीच्यांना पण हसवतो आणि तुझ्यासारखा दोस्त मिळाला की मजा पण करून घेतो.' ओमान ला त्याच्या घरी यायचं त्याने मला स्वतःहून आमंत्रण दिलं आणि ' माझी बायको मी पागल आहे असं सांगेल तुला...तिला हो म्हण नाहीतर ती दोघांनाही जेवायला नाही देणार' अशी वर मखलाशी केली.

आयुष्य स्वच्छंदीपणे जगणाऱ्या आणि कोणाचीही भीडभाड न ठेवता बिनधास्त राहणाऱ्या या माणसाला मी पुन्हा कधीही भेटू शकलो नाही. काही महिन्यातच हा कुठेतरी दुसरीकडे नोकरी करायला लागल्याचं कळलं. त्याच्या जुन्या ऑफिसच्या रेसेपशनिस्टने हा गेल्यावर अनेकांनी ऑफिसमधलं सगळं चैतन्य निघून गेल्यासारखा वाटायला लागल्याचं सांगितलं आणि अनेकांच्या जीवाला चुटपुट लावून गेलेला हा उंटावरचा शहाणा मला आयुष्य कसा जगायचं हे शिकवून गेलेला प्रेषित वाटायला लागला.

Comments

Popular posts from this blog

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने...

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...