Skip to main content

इव्ह आणि ऍडम

पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला.

एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक  वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहे. कामसू आणि मेहेनती म्हणून ओळखले जाणारे हे लोक स्वभावाने सुद्धा अतिशय मृदू आणि  मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे बरेच वेळा त्यांच्याशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही. लिन्टा सुद्धा अशीच परिचयाची झाली आणि आणि कधी तिच्या ऑफिसमध्ये कामानिमित्त थांबायची वेळ आली तर मजा मस्करी करण्याइतपत मोकळी आमची मैत्री झाली.

स्वतःला अट्टाहासाने अतिशय टापटीप आणि अदबशीर ठेवणारी ही मुलगी माझ्याहून तीन वर्षांनी लहान होती. अर्थात ते कळल्यावर मला त्याचं मुळीच आश्चर्य वाटलं नाही, कारण फिलीपिन्स आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमधले लोक चिरतारुण्याचं वरदान घेऊनच जन्माला आलेले असतात हे मला माहित होतं. वयाचा अंदाज हमखास चुकेल अशी शरीरयष्टी आणि एकही सुरकुती नसलेले आजूबाजूच्या अनेक फिलिपिनो लोकांचे चेहरे माझ्यासारख्या व्यक्तीला उगीच 'स्वतःच्या नसलेल्या देखणेपणाची' जाणीव करून द्यायला पुरेसे होते.. अशा वेळी मनात आपोआप उत्पन्न होणाऱ्या न्यूनगंडातून कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाचं ' विधात्या, तूही ( ! ) आमच्यावर रुसलास का रे...' चं स्वगत थोड्या वेगळ्या कारणासाठी आठवून जायचं. या लिन्टा नामक चिरतरूण सुंदरीचा चेहरा सतत हसमुख दिसायचा. तिचं गोड आवाजातलं मार्दवयुक्त बोलणं सुद्धा कधीही आणि कुठेही भेटलो तरी तसंच अनुभवायला मिळत असल्यामुळे ही मुलगी सुखी माणसाचा ( की स्त्रीचा ) सदरा घालूनच जन्माला आलेली आहे असा मी समज करून घेतला होता आणि तिच्या तश्या आयुष्याचा हेवा सुद्धा वाटून घेतला होता. हे सगळे समज माझे मीच करून घेतलेले असल्यामुळे असेल कदाचित, पण ज्याप्रमाणे पावसात उभ्या असणाऱ्या व्यक्तीचे वरकरणी हसऱ्या दिसणाऱ्या चेहेऱ्यावरचे अश्रू केवळ वरून धो धो कोसळणाऱ्या पाण्यात लपले जातात तशीच काहीशी तिची कहाणी होती आणि हे कळायला मला बराच वेळ लागला.

क्लायंटच्या काही महत्वाच्या गोष्टी मला माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी करून देत असताना तिच्या हातून चुकून एक घोळ झाला. दोघांचेही एकसारखे दिसणारे पेन ड्राइव्हस तिच्या नजरचुकीमुळे बदलले गेले आणि माझ्याकडे चुकून तिने कामाच्या पेन ड्राईव्ह ऐवजी तिचा खाजगी पेन ड्राईव्ह दिला. ऑफिस मध्ये आल्यावर मला चूक कळली आणि मी तिला लगेच झालेल्या घोटाळ्याबद्दल कळवलं.अनपेक्षितपणे  ' आत्ताच्या आत्ता मला तो परत आणून दे , अगदी काहीही झालं तरी ' अशा शब्दात तिने मला जवळ जवळ अदृश्य हातांनी मानगूट पकडूनच सांगितलं आणि मी थोडासा चिडलो. माझ्यासाठी या गोड नाजूक मुलीचा हा नवीन अवतार बुचकळ्यात टाकणारा होता. काही तास थांबून काय आभाळ कोसळणार आहे का, अशा शब्दात मी तिला दामटवायचाही प्रयत्न केला. संध्याकाळपर्यंत थांबायची विनंती वारंवार करूनही तिने खूपच ताणून धरल्यामुळे माझा नाईलाज झाला.त्यात " मला येणं शक्य नाहीये कारण बॉसने ऑफिसमध्ये सुरु असलेल्या महत्वाच्या कॉन्फरेन्ससाठी थांबायचंच आहे अशी ताकीद दिलीय" म्हणून तिने मलाच हातातलं काम टाकून तिच्या ऑफिसमध्ये यायची गळ घातली. झक मारली आणि हिला लगेच पेन ड्राइव्ह बदलल्याचं सांगितलं, असं मनातल्या मनात म्हणत रागारागातच मी पुन्हा तिच्या ऑफिसच्या दिशेने निघालो. चिडलो असल्यामुळे असेल, पण पुन्हा पुन्हा तिचे फोन आल्यावर तिला दोन शब्द सुनावले सुद्धा आणि शेवटी तिच्या ऑफिसच्या खाली तिला भेटल्यावर तिच्या हातावर तो पेन ड्राईव्ह मी जवळ जवळ आपटला. स्त्रीदाक्षिण्य वगैरे संस्कार त्या क्षणी गळून पडलेले होतेच, पण डोक्यात राग गेलेला असल्यामुळे मी तिच्याशी किमान सभ्यतेखातरही काहीही नं बोलता मागे वळलो.

' यातल्ये कोणतेही फोल्डर्स ओपन केले नाही ना?' तिने विचारलं. मुद्दाम तिरसट उत्तर द्यायचं म्हणून ' हो, सगळे बघितले आणि ऑफिस मध्ये माझ्या कॉम्पुटर मध्ये कॉपी पण केले.... आता जा ' असा सगळा राग एकदाचा तिच्यावर काढून मी गाडीकडे वळलो. अचानक मागून एक दीर्घ सुस्कारा ऐकू आला.आता हिला काय झालं, म्हणून वळून पाहिलं तर ती डोकं धरून मटकन खाली बसली होती आणि घळाघळा रडायला लागली होती. हे सगळं मला अनपेक्षित होतं. अश्रू बघितल्यावर भले भले लोक विरघळतात...माझ्यासारख्या माणसाचा त्या अश्रूंपुढे कितीसा निभाव लागणार? काही सेकंद मीच गांगरलो, पण शेवटी स्वतःला सावरत मी राग आवरता घेतला, तिला शांत व्हायला सांगितलं आणि समोरच्या कॉफी शॉप मध्ये तिला घेऊन गेलो. हातात कॉफी अली तरी तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि कॉफी प्यायला काही ती तयार होत नव्हती. शेवटी न राहावून मीच प्रश्न केला

"इतकं काय झालं रडायला? कुक्कुलं बाळ आहेस का? तुझ्यावर कधी कोणी चिडलं नाही का आजपर्यंत? माझ्यासुद्धा रागाचा कडेलोट झाला होता...असं काय झालं होतं कि संध्याकाळपर्यंत सवड नव्हती काढता येत तुला?"

" पेन ड्राईव्ह मधलं काय काय बघितल्यास ते सांग आधी..." शाळेत जाणाऱ्या मुलांच्या तोंडी शोभेल असं तो प्रश्न मला अजून वैताग देऊन गेला. ही मुलगी इतकी पोरकट कशी, याचं मला आश्चर्य वाटत होतं.

" का? असं काय आहे त्यात? "

" त्यात माझे पर्सनल फोटो आहेत....बघितले असशीलच चवीने.... कोणाला त्याबद्दल सांगितलं असशील तर माझी नोकरी जाईलच, पण हा देश सुद्धा सोडावा लागेल "

आता नखशिखांत हादरायची वेळ माझी होती. तिच्या त्या सगळ्या थयथयाटाचा विचार मी ' एका पोरकट मुलीचं अल्लड वागणं ' इतक्याच सीमारेषेपर्यंत केला होता. हे प्रकरण त्याच्या खूप पुढचं आहे हे आता मला जाणवायला लागलं होतं. ही मुलगी ऑफिस च्या बाहेर काही ' नको ते ' करते कि काय, अशी शंका मनाला चाटून गेली आणि मी हादरलो.

"ऑफिस मधून का काढतील? तू काहीही काय बोलतेस? कळतंय का तुला तरी हे सगळं?" तोंडातून शब्द निसटले, पण त्यात आधीचा त्रागा आता औषधालाही शिल्लक नव्हता.

" या देशात नाही चालत हे......इथेच काय, माझ्या स्वतःच्या देशात सुद्धा हे नाही चालत......त्यात माझी पार्टनर....." आणि ती एकदम शांत झाली.

थोडा वेळ असाच शांततेत गेला.  माझ्याबद्दल ' विनंती केली तर हा मनुष्य कोणालाही काहीही सांगणार नाही' असा विश्वास वाटल्यामुळे की ' याला सगळं नाही सांगितलं तर हा चारचौघात आपलं गुपित उघड पाडेल' या भीतीमुळे कुणास ठाऊक , पण तिने मला तिची कर्मकहाणी सांगायला सुरु केली.

खुद्द vatican city फिकी वाटेल अश्या कमालीच्या कर्मठ आणि धर्मभोळ्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली होती. दोन थोरल्या बहिणी nun होऊन येशूच्या चरणावर सर्वस्व अर्पण करून घरातून कायमच्या चर्चमध्ये मुक्कामाला गेलेल्या आणि पाठचा भाऊ देशाच्या सैन्यदलात. घरात ख्रिस्ती धर्मानुसार प्रत्येक गोष्ट काटेकोर असावी असा आई-वडिलांचा आग्रह ... खरंतर अट्टहास. गर्भपात, घटस्फोट अश्या गोष्टींना धर्म अनुमती देत नाही म्हणून घरच्यांचा जबरदस्त विरोध. वयात आल्यावर घरच्यांनी एका सैन्यदलातच काम करणाऱ्या परिचयातल्या मुलाशी  तिचं लग्नं लावून दिलं. पहिल्या गर्भारपणाच्या वेळी गर्भाची व्यवस्थित वाढ होत नाही असं कळल्यावर तिने मुलाला जन्म न द्यायची भूमिका घेतली आणि घरातल्या त्या कर्मठ वातावरणात जबरदस्त भूकंप झाला.

" नवऱ्याने, बापाने आणि ते कमी पडलं म्हणून की काय पण लहान भावाने सुद्धा शिवीगाळ केली. मारहाण केली.अर्धवट, शारीरिक आणि मानसिक व्यंग असलेलं आणि नुसता मांसाचा गोळा होऊन ज्याला आयुष्य काढावं लागलं असतं असं मूल मुळात जन्माला का येऊ द्यायचं? पण कोणालाही हे समजत नव्हतं. शेवटी सोडलं घर आणि घटस्फोटाची सोय सुद्धा नसल्यामुळे सरळ एकटं आयुष्य जगायचं ठरवून नोकरी शोधायला सुरुवात केली. आधी कतार मध्ये आणि त्यानंतर दोनच वर्षात दुबई मध्ये नोकरी मिळाली आणि स्वतःच्या हिमतीवर मी जगायला सुरुवात केली "

पेन ड्राईव्ह मधल्या गोष्टी इतरांना समजल्या तर नोकरी जाणण्याचा तिने वारंवार केलेला उल्लेख मला या कर्मकहाणीतल्या कशाशीही जोडता येत नव्हता. तिचं नवरा सैन्यदलात असला, तरी अचानक जेम्स बॉण्ड सारखा तो कुठून तरीही अवतरेल आणि तिचं होत्याचं नव्हतं करून निघून जाईल हे दुबईसारख्या देशात तरी शक्य नव्हतं. शेवटी भरकटत चाललेला संभाषण पुन्हा रुळावर आणण्यासाठी मी तिला मुद्द्याचा प्रश्न विचारला...

" तुझ्या नोकरीशी आणि या देशात राहण्याशी तुझ्या या भूतकाळाचा नक्की संबंध काय? की तुला ही भीती आहे कि परत जावं लागलं तर फिलिपिन्समध्ये तुझ्या जीवावर बेतेल ? "

दोन मिनिटं थांबून, एक दीर्घ श्वास घेऊन आणि आवाजाची पट्टी एकदम चांगले दोन-तीन सूर कमी करून ती म्हणाली, " मी इथे माझ्या पार्टनर बरोबर रहाते. "

घटस्फोट न घेता दुसऱ्या व्यक्तीबरोबर ती राहते ही गोष्ट सगळ्यांना कळेल या गोष्टीची तिला भीती आहे अशी माझी समजूत झाली आणि " ठीक आहे......आता घटस्फोट तुमच्या देशात मान्यच नाही त्याला काय करणार......आणि इथे कोणाला इतका वेळ आहे अशा सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला... " सारखी छापील वाक्यं माझ्या तोंडून बाहेर आली.

लिन्टाने एक दीर्घ श्वास घेतला. खुर्ची थोडी अजून पुढे सरकवली आणि माझ्या डोळ्याम्नाध्ये रोखून बघत तिने मला विचारलं, " तुझ्या देवाला स्मरून मला वाचन दे, की हे गुपित तू कोणालाही कळू देणार नाहीस."   

मी होकारार्थी मान डोलावल्यावर तिने मला जे सांगितलं, ते ऐकून भूकंपाच्या केंद्रबिंदूवर बसल्यासारखी माझी अवस्था झाली.

" तुला कळलं नाही.....पार्टनर म्हणजे पुरुष नाही, स्त्री. मी पुरुषांकडून आलेल्या या वाईट अनुभवानंतर परत कोणत्याही पुरुषाबरोबर राहू शकणार नाही हे मला माहित होतं......पण म्हणून मी कधीही हट्टाने समलिंगी संबंध ठेवले नाहीत बरं का. पण Joey बरोबर का कुणास ठाऊक, आपोआप होऊन गेलं....."

समलिंगी संबंध माझ्यासाठी 'अब्रमण्यम' सदरात मोडणारा विषय नक्कीच नव्हता. प्रत्येक मनुष्याला त्याच्या लैंगिक आयुष्याचे निर्णय घायचं स्वातंत्र्य असावं आणि जगाच्या पाठीवरच्या सगळ्या संस्कृतींमध्ये स्पष्ट उल्लेख असणाऱ्या समलिंगी संबंधांकडे विकृती या अर्थाने न बघता लैंगिक प्रकृती या अर्थाने बघावं यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तिचं हे गुपित मला स्वीकारणं फारसं अवघड गेलं नाही. मी हे सगळं तिला बोलून दाखवलं आणि त्यावर तिने पुढे मला जे सांगितलं, ते ऐकून मात्र माझा मेंदू सुन्न झाला.

'जोई' ही तिची पार्टनर मुळात स्त्री नव्हती. फिलिपिन्स मध्ये लिंटासारख्याच एका अती कर्मठ कॅथॉलिक घरात जन्माला आलेला तो एक पुरुष होता. लहानपणापासून त्याचा स्रीत्वाकडे ओढा होता. स्त्री करेल ते सगळं त्याला करायला आवडत होतं . कुठेतरी पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री म्हणून तो आयुष्य रेटत होता. आजूबाजूच्या समाजाने नपुंसक आणि हिजडा म्हणून हिणवलेला हा पुरुष सतत अवहेलना सहन करत वाढला आणि एके दिवशी घरच्यांपासून कायमचा लांब गेला. शेवटी स्वतःच्या मेहेनतीच्या कमाईवर त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली आणि 'लैंगिकार्थाने' त्याची 'पूर्ण' स्त्री झाली.

स्त्री म्हणून जन्माला आलेली पण परिस्थितीशी दोन हात करून स्वकर्तृत्वावर मोठी झालेली 'लिन्टा' आणि पुरुष म्हणून जन्माला येऊनही पुरुषत्वाला शाप समजणारा आणि त्यापासून सुटका करून घेऊन स्त्री म्हणून ताठ मानेने जगणारा 'जोई' हे दोन जगावेगळे मनुष्यप्राणी एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती झालेले होते. काही वर्षाच्या परिचयातून फुललेलं दोन समदुःखी मनुष्यांमधलं हे जगावेगळं प्रेम धुवट विचारांच्या लोकांसाठी अस्वीकारार्ह आणि अनैसर्गिक असेलही, पण त्या दोन जीवांसाठी प्रेमाची परिभाषा कोणत्याही नीतिनियमांच्या पलीकडची असल्यामुळे त्यांचं हे प्रेम पूर्णपणे नैसर्गिक होतं.  केवळ fantasy movies मध्ये शोभेल अशी हि विलक्षण प्रेमकहाणी मला अविश्वसनीय आणि तरीही लोभसवाणी वाटत होती. एकीने पुरुषार्थ आणि दुसरीने स्त्रीत्व मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि शेवटी लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्वीकारलेली एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार व्हायची भूमिका हा मला तरी मनुष्याच्या भावभावनांचा लोभसवाणा आविष्कार वाटत होता. समाजाचे साचेबद्ध विचार कधीही हे स्वीकारू शकले नसते म्हणून; किंबहुना म्हणूनच , त्या दोघांनी स्वतःच्या भोवताली एक अदृश्य कुंपण घालून घेतलं होतं आणि बाकीच्या जगाला कटाक्षाने त्या कुंपणाच्या बाहेर ठेवलं होतं.

शेवटी पेन ड्राईव्ह मधलं काहीही मी बघितलेलं नाहीये आणि कॉपी सुद्धा केलं नाहीये अशी तिला मी खात्री दिली. तिच्या खाजगी आयुष्याच्या अनेक 'आठवणी ' त्या पेन ड्राईव्ह मध्ये होत्या. तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला मी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि काहीतरी अविस्मरणीय अनुभवल्याची ख़ुशी मनात साठवून ठेवून मी तिथून निघालो.

आधुनिक जगातले हे ऍडम आणि ईव्ह माझ्यासाठी प्रेमाच्या सगळ्या व्याख्या बदलून टाकणारे दोन विलक्षण मनुष्यप्राणी होते, ज्यांच्या प्रेमाच्या आड समाज, जात, धर्म, लिंग किंवा तत्सम कोणतीही गोष्ट येऊ शकत नव्हती. जगासाठी अशुद्ध असलेलं हे आगळं वेगळं प्रेम माझ्या लेखी मात्र देवटाक्याच्या पाण्याइतकं शुद्ध होतं.

Comments

  1. Please continue your Arabian horror stories blog.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही  या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर  काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं. या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं. ...

शाकाहारी ड्रॅगन

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली. या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासना उडाल्यासारखे वागत होते. त्याही परिस्थितीत  ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुस...